पुण्यात दुसरे विमानतळ होण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले…
Pune Second Airport
Pune Second Airport : पुरंदर विमानतळ होणारच! पुणेकरांचा स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळ या शहराला मिळणारच आहे, अशी ठाम ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. नवी मुंबई विमानतळाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमावर शिक्कामोर्तब करत त्यांनी हे स्पष्ट केलं.
बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या केंद्रीय सहकार आणि नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ‘२४ तास जनसंपर्क कार्यालय’च्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी अनेक मान्यवर नेते आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक पूर्ण झाल्यावर पुणेकर अवघ्या सव्वा तासात नवी मुंबई विमानतळावर पोहोचू शकतील. त्यामुळे काही जण विचारतात की नवी मुंबई विमानतळ पुण्याला पुरेसं नाही का? पण मी स्पष्ट सांगतो – नवी मुंबईचा विमानतळ हा पर्याय असला, तरी पुण्याचं स्वतंत्र विमानतळ आवश्यक आहे आणि पुरंदरचं विमानतळ आपण निश्चितच उभारणार आहोत.”
या वक्तव्यानं पुणेकरांच्या मनातील अनेक शंका दूर झाल्या आहेत. कारण गेल्या काही वर्षांत पुरंदर विमानतळ प्रकल्प वारंवार पुढे ढकलला गेला होता. स्थानिक विरोध, जमिनीच्या मालकीचे प्रश्न, आणि प्रशासनातील दिरंगाईमुळे या प्रकल्पावर अनिश्चिततेचे सावट होते. मात्र आता मुख्यमंत्री थेट व्यासपीठावरून देत असलेली ग्वाही पुण्यासाठी निर्णायक मानली जात आहे.
या कार्यक्रमात मोहोळ यांच्या मंत्रीपदाच्या वर्षपूर्ती अहवालाचं प्रकाशन करण्यात आलं. त्याचप्रमाणे ‘प्रथम माणूस’ या कोरोनाकाळातील अनुभवांवर आधारित पुस्तकाचं प्रकाशनही फडणवीस यांच्या हस्ते झालं.
भाजपमधील नेतृत्व निर्मितीचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले, “मोहोळ यांना मंत्री करण्याचं श्रेय मी स्वतः घेत नाही. आम्ही देखील बुथवरून सुरुवात केलेली आहे. भाजप हा असा पक्ष आहे जो कार्यकर्त्यांना पुढे आणतो. मोहोळ यांनी महापौर म्हणून कोविड काळात उत्कृष्ट कामगिरी केली. त्या काळातच त्यांचं नेतृत्व सिध्द झालं.”
हे पण वाचा : मोबाईल युजर्ससाठी धक्का! रिचार्जचे दर वाढणार, डेटा प्लॅनही होणार मर्यादित
मोहोळ यांनी देखील आपला अनुभव सांगताना सांगितलं की, “एकदा पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यमंत्र्यांना दिल्लीला बोलावलं होतं. मी त्यांना दिल्ली विमानतळाच्या छत कोसळण्याची घटना सांगितली. तेव्हा त्यांनी सहजपणे म्हटलं, ‘तुम्ही अडीच तास उशिरा पोहोचलात!’ यावरून केंद्र सरकारमध्ये किती शिस्तबद्ध काम चालतं याचा अंदाज आला.”
मुख्यमंत्र्यांनी शेवटी स्पष्ट केलं की, “भाजपमध्ये कुणालाही केवळ हौस म्हणून पद दिलं जात नाही. पदाबरोबर जबाबदारी येते आणि शिस्तीच्या चौकटीत राहून काम करणं हीच आमची ताकद आहे.”
