5,285 घरांची म्हाडाची बंपर लॉटरी सुरू! ‘या’ अॅपवर अर्ज करा आणि घराचे स्वप्न पूर्ण करा
MHADA Lottery 2025
MHADA Lottery 2025 : घर हे केवळ एक वास्तू नसून, प्रत्येकाचं स्वप्न असतं – सुरक्षिततेचं, स्थैर्याचं आणि आपल्या माणसांसोबत जगण्याचं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोट्यवधी नागरिक प्रयत्न करत असतात. अशाच घराच्या प्रतीक्षेत असलेल्यांसाठी म्हाडा कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळानं एक मोठा दिलासा दिला आहे. मंडळाने तब्बल ५,२८५ घरांची लॉटरी जाहीर केली असून, याशिवाय ७७ भूखंडही या योजनेंतर्गत देण्यात येणार आहेत. ही घरं ठाणे, वसई (पालघर), कुळगाव-बदलापूर आणि सिंधुदुर्गमधील ओरोस इथं मिळणार आहेत.
हे पण वाचा : पुण्यात दुसरे विमानतळ होण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले…
ही लॉटरी फक्त आकड्यांची खेळी नाही, तर शेकडो कुटुंबांच्या आयुष्याचा निर्णायक टप्पा आहे. घरांच्या किंमती बाजारभावाच्या तुलनेत परवडणाऱ्या असून, विविध उत्पन्न गटांसाठी सुलभ अटींसह ही घरे उपलब्ध असतील. त्यामुळं सर्वसामान्यांसाठी ही संधी म्हणजे एका नव्या सुरुवातीचं आश्वासनच आहे.
म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ संजीव जयस्वाल यांच्या हस्ते आज दुपारी एक वाजता लॉटरीचं ‘गो-लाइव्ह’ उद्घाटन करण्यात आलं. यावेळी नव्या IHLMS 2.0 प्रणाली आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अर्ज प्रक्रियेची सुरुवात झाली. अर्जदारांसाठी ही डिजिटल प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेगवान ठरणार आहे.
या लॉटरीअंतर्गत घरांचे वाटप पाच वेगवेगळ्या योजनांतून होणार आहे. १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेत सर्वाधिक घरं देण्यात येणार असून, त्यानंतर कोकण मंडळाच्या गृहनिर्माण योजनेतूनही मोठ्या प्रमाणावर घरे मिळणार आहेत. अत्यल्प आणि मध्यम उत्पन्न गटांमधील नागरिकांसाठी ही योजना विशेष फायदेशीर ठरणार आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत १३ ऑगस्ट २०२५ पर्यंत असून, अनामत रक्कम भरण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट आहे. २१ ऑगस्ट रोजी पात्र अर्जदारांची प्रारूप यादी जाहीर होणार असून, अंतिम पात्र यादी १ सप्टेंबरला प्रसिद्ध होईल. लॉटरीची संगणकीय सोडत ३ सप्टेंबर रोजी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात सकाळी १० वाजता होणार आहे. त्यानंतर निकाल SMS, ई-मेल आणि म्हाडाच्या अॅपवर अर्जदारांना मिळेल.
या योजनेबाबत सविस्तर माहिती, अर्ज करण्याची लिंक, मार्गदर्शक माहितीपुस्तिका आणि मदतीसाठी आवश्यक व्हिडिओ व फाईल्स https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. Android आणि iOS साठी नविन मोबाईल अॅपही तयार करण्यात आले आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, अर्ज करण्याआधी सर्व मार्गदर्शक माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि लॉटरीसाठी अचूक माहिती व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा.
