सोने पुन्हा तेजीत! ९८ हजारांच्या घरात भाव; जाणून घ्या आजचे नवीन दर?
Gold Price Today
Gold Price Today : जागतिक अस्थिरतेच्या छायेत सोन्या-चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा उंच भरारी घेतली आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत जूनअखेर आणि जुलैच्या सुरुवातीलाच सोन्याचा दर पुन्हा वाढू लागला असून, प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोनं सध्या ९० हजारांच्या आसपास स्थिरावले आहे. विशेष म्हणजे, एप्रिलपासून आतापर्यंत सोन्याच्या दरात जवळपास ६ हजार रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचाही टन ठोक भाव वाढला असून, बाजार स्थिर होण्याऐवजी आणखी चढाईची चिन्हं दिसू लागली आहेत.
हे पण वाचा : खडकवासला धरणातून मोठा विसर्ग! पूरजन्य स्थितीमुळे नदीकाठी राहणाऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा
गेल्या तिन महिन्यांत सोन्या-चांदीच्या दरात सतत चढ-उतार दिसले. एप्रिलच्या सुरुवातीला ८४ हजारांच्या घरात असलेले २२ कॅरेट सोनं, एप्रिलच्या शेवटी ८६ हजारांवर गेले. मेमध्ये किंचित चढ-उतार झाल्यानंतर जूनमध्ये याच दराने ९२ हजारांचा आकडा पार केला. सध्या जुलैच्या पहिल्या आठवड्यात हा दर ९० हजार २९४ रुपये इतका आहे. म्हणजेच, मागील महिन्याच्या तुलनेत किंचित घट असली, तरी एकूण चित्रात तेजीकडील कल स्पष्ट आहे.
दुसरीकडे, चांदीचाही कल स्थिरतेहून वाढीकडे झुकलेला आहे. २५ जूनपासून दररोज किंचित चढ-उतार होत असून, २६ जूनला चांदी प्रतिकिलो एक लाख ७६०० रुपयांवर पोहोचली होती. त्यानंतर किंचित घसरण होऊन ती दोन जुलै रोजी एक लाख ६४०० रुपयांवर स्थिरावली. म्हणजेच, चांदीच्या बाजारातही गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कायम आहे.
या भाववाढीमागची प्रमुख कारणं म्हणजे –
पश्चिम आशियात सुरु असलेले तणावाचे वातावरण, युक्रेन-रशिया युद्धाची पडसाद, जागतिक चलन बाजारातील अनिश्चितता, डॉलरच्या दरात चढ-उतार, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुरक्षित गुंतवणुकीकडे कल. या सर्व घटकांचा परिणाम थेट मौल्यवान धातूंवर होतो.
बँकांचे पतधोरणही या परिस्थितीत निर्णायक ठरत आहे. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हसारख्या मध्यवर्ती बँकांच्या व्याजदर धोरणामुळे जागतिक आर्थिक अस्थिरता वाढते आणि गुंतवणूकदारांची पावलं सोन्याचांदीकडे वळतात. त्यामुळे पुढील काही आठवड्यांतही सोन्याच्या भावात मोठी घसरण होण्याची शक्यता कमीच असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
