October 31, 2026

पुणे महापालिकेच्या स्वच्छतेचा बुरखा फाटला! ‘डीप क्लीन’च्या पहिल्याच दिवशी ९८ टन कचरा सापडला

0
Pune Municipal Corporation

Pune Municipal Corporation

Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेच्या दैनंदिन स्वच्छतेचे दावे ‘डीप क्लीन’ मोहिमेच्या पहिल्याच दिवशी फोल ठरले आहेत. या विशेष मोहिमेअंतर्गत शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत एकाच वेळी स्वच्छतेचा धडाका सुरू करण्यात आला आणि या मोहिमेच्या अवघ्या एका दिवसात तब्बल ९८ टन कचरा जमा झाला. त्यामुळे ‘रोजची स्वच्छता नेमकी कुठे होते?’ हा प्रश्न शहरवासीयांना पडू लागला आहे.

हे पण वाचा : ससून रुग्णालयात ‘पार्किंग माफिया’चा सुळसुळाट; सामान्य रुग्णांच्या खिशावर डल्ला

महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी कार्यभार स्वीकारताच शहरातील अस्वच्छतेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर संपूर्ण शहरात स्वच्छता मोहीम राबवली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या पार्श्वभूमीवर सोमवारपासून पुन्हा एकदा ‘डीप क्लीन’ मोहिमेला सुरुवात झाली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी मिळालेले आकडे सांगतात की, महापालिकेचा ‘दैनंदिन स्वच्छता’चा दावा प्रत्यक्षात किती तोकडा आहे.

या मोहिमेत २७ टन ओला आणि सुका कचरा, ५९ टन राडारोडा आणि १२ टन झाडांचा पालापाचोळा गोळा करण्यात आला. याशिवाय ३३ पडीक वाहने, १२९ अनधिकृत पथारी, १८९ धोकादायक फांद्या, १५ खड्डे, ३६ किमी अनधिकृत ओव्हर केबल्स, आणि ४०० पेक्षा अधिक फ्लेक्स-बॅनर्स काढून टाकण्यात आले.

ही कारवाई क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने आपल्या हद्दीतील एक मुख्य रस्ता निवडून त्यावर पूर्ण दिवस मोहिम राबवली. मोहिमेसाठी १,६६६ कर्मचारी उतरले होते. या मोहिमेची गंमत म्हणजे, जी कामे महापालिकेने आधीच रोजच्या स्वरूपात केली पाहिजेत, ती ‘विशेष मोहिमे’तच का होते आहेत, हे लक्षात येते.

ही स्थिती सांगते की, शहरातील नियमित स्वच्छतेकडे केवळ कागदोपत्रीच लक्ष दिले जात आहे. ‘डीप क्लीन’सारख्या मोहिमा झाल्यानंतरच रस्त्यावरील अडथळे, अतिक्रमणं, आणि साचलेला कचरा लक्षात येतो, ही गोष्टच प्रशासनाच्या अपयशाची साक्ष देणारी आहे.

हे पण वाचा : डिजिटल स्वाक्षरी बंद, कामकाज ठप्प! पिंपरी महापालिकेची 112 कोटींची प्रणाली कोलमडली

यापुढील काळात ही मोहीम काही दिवस सुरू राहणार असून, आजपासून नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग घेतला जाणार आहे. मात्र, ही केवळ एका दिवसाची चमत्कारिक स्वच्छता न राहता, कायमस्वरूपी व्यवस्थेचा भाग झाली पाहिजे, अशी अपेक्षा पुणेकर नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply