October 29, 2026

खडकवासला धरणातून मोठा विसर्ग! पूरजन्य स्थितीमुळे नदीकाठी राहणाऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा

0
Khadakwasla Dam Water Level

Khadakwasla Dam Water Level

Khadakwasla Dam Water Level : पुणे शहरासाठी पाण्याचा प्रमुख स्रोत असलेल्या खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सोडला जाणारा विसर्ग बुधवारी सकाळी मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला. सकाळी १० वाजेपासून सांडव्यावरून तब्बल ८५२२ क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. यामुळे नदीकाठच्या भागांमध्ये पूरजन्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन, नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

हे पण वाचा : पुणे महापालिकेच्या स्वच्छतेचा बुरखा फाटला! ‘डीप क्लीन’च्या पहिल्याच दिवशी ९८ टन कचरा सापडला

खडकवासला पाटबंधारे उपविभागीय अभियंता मोहन शं. भदाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सुरू असलेला ६४५१ क्युसेक विसर्ग वाढवून बुधवार सकाळपासून तो ८५२२ क्युसेकपर्यंत नेण्यात आला आहे. पावसाचं प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहानुसार हा विसर्ग पुढेही वाढवावा लागू शकतो किंवा काही वेळाने कमीही केला जाऊ शकतो.

खडकवासला धरणात सध्या १.३३ टीएमसी (६६.१९%) पाणीसाठा आहे. यंदा आतापर्यंत मुठा नदीत एकूण ३.१९ टीएमसी इतका विसर्ग करण्यात आला आहे. पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांतील साठाही लक्षणीय आहे.
पानशेत: ५.७७ टीएमसी (५४.१८%)
वरसगाव: ७.७० टीएमसी (६०.०५%)
टेमघर: १.६४ टीएमसी (४४.१३%)

या चारही धरणांमध्ये मिळून एकूण १६.४१ टीएमसी (५६.३०%) साठा आहे, जो मागील वर्षी याच दिवशी फक्त ४.७२ टीएमसी (१६.१९%) होता. म्हणजेच, यंदा गतवर्षीच्या तुलनेत चारपट अधिक पाणीसाठा असून त्यामुळे विसर्गही तुलनेत मोठा आहे.

हे पण वाचा : ससून रुग्णालयात ‘पार्किंग माफिया’चा सुळसुळाट; सामान्य रुग्णांच्या खिशावर डल्ला

या पार्श्वभूमीवर, पाटबंधारे विभागाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, नागरिकांनी नदीकाठच्या परिसरात अनावश्यक गर्दी करू नये, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. विशेषतः सिंहगड रस्ता, देवकर वस्ती, अप्पा बळवंत चौकाजवळील काही भाग, आणि कसबा पेठ परिसरात रहिवासी किंवा व्यावसायिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असं प्रशासनाचं आवाहन आहे.

Leave a Reply