पुण्यात खाद्यतेल दरात जबरदस्त वाढ! इराण-इस्राईल संघर्षाचा थेट फटका नागरिकांच्या खिशाला; जाणून घ्या नवीन दर?
Oil Price Hike
Oil Price Hike : पावसाळा आणि सणासुदीचा हंगाम सुरू होत असतानाच गृहिणींसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. पुण्यातील मार्केट यार्डात खाद्यतेलाच्या किमतींनी झपाट्याने उचल घेतली असून डब्याचे दर तब्बल ५० ते ६० रुपयांनी वाढले आहेत. इराण आणि इस्राईल यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती, आंतरराष्ट्रीय खनिज तेलवाढ, आणि देशांतर्गत मागणीचा भडका यामुळे हा महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे.
हे पण वाचा : विमान कोसळले! ‘या’ विमानतळावर अलर्ट; रुग्णवाहिका-अग्निशमन ११ मिनिटांत दाखल
मार्केट यार्डातील व्यापारी रायकुमार नहार यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरतेचा परिणाम आपल्याकडे दिसत असून मागणी कायम राहिल्यामुळे खाद्यतेलाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.”
गेल्या काही आठवड्यांमध्ये सरकारने कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्क दहा टक्क्यांनी कमी केले होते, त्यामुळे थोडक्याच काळासाठी दरात सौम्य घट झाली होती. मात्र इराण-इस्राईल संघर्ष उफाळल्याने खनिज तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या. परिणामी, पाम, सूर्यफूल आणि सरकी तेलाच्या किमतींनी उसळी घेतली.
घाऊक बाजारातील सध्याचे दर (१५ लिटर डबा):
शेंगदाणा तेल: ₹२१०० ते ₹२४००
सूर्यफूल तेल: ₹१९८० ते ₹२१३०
पाम तेल: ₹१६३५ ते ₹२१६०
सरकी तेल: ₹१९५० ते ₹२२००
वनस्पती तूप: ₹१८५० ते ₹२२०० (मात्र मागणी कमी असल्याने काही प्रमाणात घट)
हे पण वाचा : ‘चला हवा येऊ द्या २’मधून निलेश साबळे बाहेर! सूत्रसंचालन करणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता
खोबरेल तेलाचा सुद्धा दरवाढीचा फटका
महाराष्ट्रात नारळाचे उत्पादन कमी झाल्याने खोबरेल तेलाच्या किमतीही झपाट्याने वाढल्या आहेत. गोटा खोबऱ्याच्या किमतीत वाढ झाल्याने २५ किलोच्या खोबरेल तेल डब्याचा दर आता ₹६,००० च्या पुढे गेला आहे. परिणामी, बाजारात खोबरेल तेलाची आवकही कमी झाली आहे.
महागाईचा आणखी फटका बसणार?
पावसाळ्यामुळे घराघरात तेलाची खपत वाढते. याच दरम्यान श्रावण, गणेशोत्सव आणि पुढील सणासुदीच्या तयारीला लागणाऱ्या गृहिणींना खाद्यतेलाच्या दरवाढीने चांगलाच तडाखा दिला आहे. व्यापार जगताचे म्हणणे आहे की, “सध्याच्या घडामोडी पाहता पुढील आठवड्यांतही खाद्यतेलाचे दर स्थिर राहण्याची शक्यता कमी असून आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.”
सामान्यांच्या खिशावर भार
पेट्रोल-डिझेलप्रमाणे खाद्यतेल सुद्धा आता “राजकीय आणि जागतिक घडामोडींवर अवलंबून” झाले आहे. घाऊक दरवाढीचा थेट परिणाम किरकोळ बाजारातही दिसू लागला असून आता ग्राहकाला स्वयंपाकघर चालवणे अधिक महाग होऊ लागले आहे.
