October 29, 2026

पुणेकरांना ५० लाखांच्या आतली घरंच का हवीत? जाणून घ्या घर खरेदीतील नवा ट्रेंड!

0
Affordable Housing

Affordable Housing

Affordable Housing : पुण्यातील गृहनिर्माण बाजारपेठेचा चेहरामोहरा हळूहळू बदलतो आहे. मोठमोठ्या आलिशान इमारतींऐवजी आता पुणेकरांचा कल परवडणाऱ्या, मध्यमवर्गीयांच्या आवाक्यातील घरांकडे वळलेला दिसतो आहे. मे महिन्यात झालेल्या घर खरेदी-विक्रीच्या ११,९३० व्यवहारांपैकी जवळपास निम्मे व्यवहार हे ५० लाख रुपयांखालील घरांचे होते, हे या बदलत्या प्रवृत्तीचे स्पष्ट निदर्शक आहे.

हे पण वाचा : पुण्यात खाद्यतेल दरात जबरदस्त वाढ! इराण-इस्राईल संघर्षाचा थेट फटका नागरिकांच्या खिशाला; जाणून घ्या नवीन दर?

देशातील नामवंत संपत्ती सल्लागार संस्था ‘नाईट फ्रँक इंडिया’ने जाहीर केलेल्या ताज्या अहवालानुसार, पुण्यात मे महिन्यात घर खरेदी-विक्रीचे व्यवहार एप्रिलच्या तुलनेत १७ टक्क्यांनी घसरले आहेत. एप्रिलमध्ये १४,४२१ व्यवहार झाले होते, तर मेमध्ये ही संख्या ११,९३० वर आली. ही घर विक्रीची गेल्या आठ महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळी आहे. याच काळात मुद्रांक शुल्क संकलनातही २३ टक्क्यांची मोठी घसरण नोंदवण्यात आली. एप्रिलमध्ये ५४७ कोटींचे संकलन झाले होते, ते मेमध्ये ४२१ कोटींवर आले.

या घसरणीचे मुख्य कारण म्हणजे उच्च-मूल्याच्या घरांना आलेली मर्यादित मागणी. अहवालानुसार, मे महिन्यातील घर खरेदी व्यवहारांपैकी २५ लाख रुपयांपर्यंतच्या घरांचे प्रमाण २० टक्के तर २५ ते ५० लाखांच्या घरांचे प्रमाण २९ टक्के इतके आहे. यामुळेच एकूण व्यवहारांपैकी जवळपास ४९ टक्के व्यवहार हे ५० लाखांखालील घरांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याउलट, ५० लाख ते १ कोटी रुपयांतील घरांचे प्रमाण ३३ टक्के, १ ते २.५ कोटी रुपयांतील घरांचे प्रमाण १७ टक्के, २.५ ते ५ कोटींचे २ टक्के आणि पाच कोटींपेक्षा महागड्या घरांचे प्रमाण फक्त एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. ही आकडेवारी पाहता, पुण्यातील घर खरेदीदारांचा कल आर्थिक स्थैर्य आणि परवडणाऱ्या निवासयोजनांकडेच असल्याचे अधोरेखित होते.

अर्थव्यवस्थेतील चढ-उतार, महागाईचा झपाटा आणि बँकांच्या कर्जदरातील बदल यामुळे ग्राहकांची निवडही वास्तववादी झाली आहे. मोठ्या बजेटऐवजी स्थिर उत्पन्न असलेल्या ग्राहकांसाठी सोयीस्कर अशा लहान-मोठ्या सदनिकांना अधिक प्राधान्य दिलं जात आहे. हे लक्षात घेता बिल्डर्स आणि रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यावसायिकांनीही आता ग्राहकांच्या या अपेक्षांनुसार आपले प्रकल्प आखण्याची गरज आहे.

हे पण वाचा : विमान कोसळले! ‘या’ विमानतळावर अलर्ट; रुग्णवाहिका-अग्निशमन ११ मिनिटांत दाखल

तथापि, संपूर्ण मे महिन्याच्या संथ गतीकडे पाहता ही चित्र फारशी उत्साहवर्धक नसली, तरी जानेवारी ते मे या कालावधीत मात्र पुण्यातील घर व्यवहारात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ८५ हजार २९० व्यवहार झाले होते, तर यंदा ही संख्या ९९ हजार ३३९ इतकी झाली आहे. त्यामुळे पहिल्या पाच महिन्यांत एकूण घर विक्रीत १६ टक्के आणि मुद्रांक शुल्कात २० टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर नाईट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष शिशिर बैजल यांनी सांगितले की, मे महिन्यातील संथ गती चिंताजनक असली तरी एकूण वर्षाच्या सुरुवातीच्या काळात बाजारात चांगली हालचाल झाली आहे. उच्च बजेटच्या घरांच्या तुलनेत मध्यमवर्गीय ग्राहकांनी अधिक सक्रियता दाखवली असून, भविष्यात पुणे शहरात परवडणाऱ्या घरांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply