विमान कोसळले! ‘या’ विमानतळावर अलर्ट; रुग्णवाहिका-अग्निशमन ११ मिनिटांत दाखल
Solapur Airport Mock D
Solapur Airport Mock Drill : सोलापूर शहरात एकच खळबळ उडाली… विमान कोसळल्याची खबर मिळताच नागरिक, प्रशासन आणि प्रसारमाध्यमांची पावलं थेट होटगी रोडवरील विमानतळाकडे वळली. मात्र ही दुर्घटना नव्हे, तर देशभर सुरू असलेल्या मॉक ड्रिलचा (आपत्ती व्यवस्थापन चाचणी) भाग होता. अहमदाबादमधील अपघाताच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सोलापूर विमानतळावर हे रिअॅलिटी बेस्ड ड्रिल राबवण्यात आले.
हे पण वाचा : ‘चला हवा येऊ द्या २’मधून निलेश साबळे बाहेर! सूत्रसंचालन करणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता
मंगळवारी सकाळी ११.१० वाजता विमान कोसळल्याची बनावट (मॉक) खबर रुग्णवाहिका, अग्निशामक दल आणि संबंधित यंत्रणांना देण्यात आली. या संदेशानंतर अवघ्या ११ मिनिटांत तीन रुग्णवाहिका आणि दोन अग्निशमन गाड्या विमानतळावर दाखल झाल्या. यामध्ये रघोजी, यशोधरा, अश्विनी रुग्णालयांच्या रुग्णवाहिकांचा समावेश होता. १०८ आपत्कालीन सेवाही सक्रिय झाली.
अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होताच केवळ १० मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. ही संपूर्ण कारवाई तितकीच खऱ्या घटनेप्रमाणे पार पडली. विशेष म्हणजे मदतकार्याच्या वेळी माध्यम प्रतिनिधी, प्रवाशांचे नातेवाईक यांच्यासाठी वेगळ्या जागेची व्यवस्था करून गोंधळ टाळण्यात आला.
या साऱ्या प्रक्रियेवर विमानतळ प्रमुख अंजनी शर्मा, अग्निशमन अधिकारी राकेशकुमार यांनी बारकाईने निरीक्षण ठेवले. त्यांच्या उपस्थितीतच मदतकार्यातील अडचणी, वेळेचे नियोजन आणि प्रतिसाद यांची नोंद घेतली गेली. तसेच उत्तर सोलापूरचे तहसीलदार नीलेश पाटील, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघमारे व अन्य अधिकारीही उपस्थित होते.
हे पण वाचा : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! पुण्यासह ‘या’ भागांना ऑरेंज अलर्ट
मॉक ड्रिल म्हणजे अचानक उद्भवणाऱ्या गंभीर परिस्थितीत प्रशासन, आरोग्य सेवा, अग्निशामक दल आणि पोलिसांची तत्काळ प्रतिक्रिया आणि समन्वय याची परीक्षा. यामध्ये कोणती यंत्रणा किती वेळात पोचते, कोणत्या त्रुटी दिसतात आणि कुठे सुधारणा गरजेची आहे, हे लक्षात येते.
अहमदाबादमधील विमान अपघाताने देशभरात चिंता वाढवली होती. त्यामुळे अशा मॉक ड्रिल्स आता अनिवार्य करण्यात आल्या आहेत. सोलापुरात पार पडलेली ही चाचणी यशस्वी झाली असून तिचा सविस्तर अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.
