October 30, 2026

पुणे पोलिसांचा ऐतिहासिक निर्णय! यंदा ढोल-ताशावर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही, पण….

0
Pune Ganeshotsav Dhol Tasha

Pune Ganeshotsav Dhol Tasha

Pune Ganeshotsav Dhol Tasha : पारंपरिक गणेशोत्सव साजरा करताना ढोल-ताशा पथकांवर खटले दाखल होण्याच्या घटनांनी गेल्या काही वर्षांमध्ये कलावंतांमध्ये अस्वस्थता निर्माण केली होती. मात्र यंदाच्या गणेशोत्सवात पुणे पोलिसांनी एक मोठा आणि स्वागतार्ह निर्णय घेतला असून, ढोल-ताशा वाजवणाऱ्या कोणत्याही पथकावर गुन्हे दाखल केले जाणार नसल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हा निर्णय म्हणजे एकप्रकारे पुण्याच्या परंपरेला, सांस्कृतिक ओळखीला आणि लोकांच्या भावना जपण्याचा सकारात्मक प्रयत्नच मानावा लागेल.

हे पण वाचा : गुरुवार पेठेसह पुण्यातील ‘या’ ठिकाणच अनधिकृत बांधकामं पाडणार! सरकारचा मोठा निर्णय

ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्र या संघटनेच्या पुढाकाराने नुकताच ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात वाद्यपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला पुणे शहरातील विविध ढोल-ताशा पथकांचे प्रतिनिधी, गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. त्याच मंचावर पुणे पोलिसांनी आपला निर्णय जाहीर केला, ज्यामुळे उपस्थितांमध्ये एकच जल्लोष उसळला.

मात्र, हा दिलासा मिळाला असला तरी नियमांचे पालन करण्याचं महत्त्व पोलिसांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. रात्री १० वाजेनंतर सराव होणार नाही, सरावाच्या ठिकाणी स्थानिक नागरिकांची गैरसोय होणार नाही, अशा अटींचं काटेकोर पालन करावं लागणार आहे. सरावासाठी कोणत्या ठिकाणी, कोणत्या वेळेत ढोल-ताशा वाजवले जातील, याची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला आधीच कळवावी लागणार आहे. नियमभंग केल्यास कारवाई टाळता येणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

हे पण वाचा : समुद्रात वाहत होता पुणेकर पर्यटक! स्थानिकांच्या धाडसामुळे थरारक बचाव; घटना वाचून अंगावर येईल काटा

पुण्यातील ढोल-ताशा पथकांची एक दीर्घ आणि वैभवशाली परंपरा आहे. पुण्याचा गणेशोत्सव हे राज्यभरातील सांस्कृतिक आकर्षण मानलं जातं आणि त्यात ढोल-ताशा वादनाचा भारदस्त गजर एक अनोखा रंग भरतो. मात्र मागील काही वर्षांमध्ये काही पथकांवर ध्वनीप्रदूषण, वेळेच्या मर्यादेचं उल्लंघन, आणि परवानगीशिवाय सराव यामुळे गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे कलावंतांमध्ये नाराजी होती आणि हे वातावरण आनंदी सणाला ताण देणारं ठरत होतं.

मात्र यंदा पोलिसांनी घेतलेला हा निर्णय परंपरेला जपणारा असून, उत्सवाच्या तयारीला नवा हुरूप देणारा ठरतो आहे. ढोल-ताशा महासंघानेही पोलिस प्रशासनाचे आभार मानले असून, नियम पाळत सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचा निर्धार पथकांनी व्यक्त केला आहे. ‘परंपरा आणि शिस्त यांचा समतोल राखत उत्सव साजरा करणे हीच खरी पुण्यनगरीची ओळख आहे,’ असा सूर अनेक ठिकाणी उमटतो आहे.

Leave a Reply