पुणेकरांनो सावधान! महानगरपालिकेने नागरिकांना दिला मोठा इशारा; वाचा सविस्तर बातमी
Pune Water Supply
Pune Water Supply : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहराला मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसत आहे. धरणक्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात माती, गाळ वाहून येत आहे. यामुळे शहरात होणाऱ्या पाणीपुरवठ्यात गढूळपणा वाढला असून, अनेक भागांतून नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने शहरवासीयांना महत्त्वाचे आवाहन केले आहे – “पाणी उकळूनच प्या.”
हे पण वाचा : हिंजवडी आयटी पार्कचा पिंपरी-चिंचवडमध्ये समावेश नकोच; ग्रामपंचायतींचा तीव्र विरोध
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या माहितीनुसार, धरणातील वाढलेला गढूळपणा जलशुद्धीकरण केंद्रांच्या क्षमतेपलीकडे जात आहे. परिणामी, प्रक्रिया केल्यानंतरही पाण्यात पारदर्शकता येण्यात अडचण निर्माण झाली आहे. काही ठिकाणी पाणी नितळ न येता गढूळ स्वरूपातच नळांमधून येत आहे.
महापालिका प्रशासनाने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जलशुद्धीकरणाच्या प्रक्रियेत अधिक काळजी घेतली असली तरी, नागरिकांनी स्वतःहून खबरदारी घेणे गरजेचे आहे. महापालिकेने नागरिकांना पाणी गाळून, तुरटी फिरवून आणि उकळून वापरण्याचे आवाहन केले आहे.
विशेषतः महापालिकेच्या हद्दीत अलीकडेच समाविष्ट झालेल्या गावांमध्ये – नांदेड, नांदोशी, खडकवासला, किरकीटवाडी, धायरी, सणसनगर, नन्हे – या भागांत पाण्याची पूर्ण प्रक्रिया न होता केवळ निर्जंतुकीकरण करून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी अधिक दक्ष राहून पाणी वापरणे आवश्यक असल्याचे प्रशासनाचे स्पष्ट आवाहन आहे.
हे पण वाचा : महाराष्ट्रात कार खरेदी महाग! सरकारकडून 10 लाखांची करवाढ लागू, जाणून घ्या नवीन दर?
पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले की, “महापालिकेचे पाणी हे मानकांनुसार पिण्यास योग्य आहे, मात्र गढूळपणामुळे त्यात दिसणारी अशुद्धता काही नागरिकांना त्रासदायक वाटत आहे. त्यामुळे पावसाळी परिस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून सर्वांनी पाणी उकळून प्यावे, ही विनंती.”
दरम्यान, शहरातील काही भागांत पाणी गढूळ स्वरूपात येत असल्याने नागरिकांत नाराजी आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती यांना अशुद्ध पाण्यामुळे त्रास होण्याची शक्यता असल्याने ही समस्या गांभीर्याने घेतली जात आहे.
