October 29, 2026

वाहतूक कोंडीने पुणेकर हैराण! शास्त्रीनगर सिग्नल बंद, गाड्यांच्या रांगा वाढल्या

0
Nagar Road Traffic Jam

Nagar Road Traffic Jam

Nagar Road Traffic Jam : पावसाळा सुरु होताच पुण्यातील वाहतूक व्यवस्था पुन्हा एकदा ढासळू लागली आहे. विशेषतः नगर रस्त्यावर, येरवडा भागातील शास्त्रीनगर चौक परिसरात बुधवारी सायंकाळी वाहनचालकांना भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. सिग्नल यंत्रणा अचानक बंद पडल्याने तासन्‌तास वाहने रांगेत अडकून राहिली आणि सोशल मीडियावर नागरिकांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.

हे पण वाचा : पुणेकरांनो सावधान! महानगरपालिकेने नागरिकांना दिला मोठा इशारा; वाचा सविस्तर बातमी

शास्त्रीनगर चौक हा नेहमीच वाहतूक गजबजाटासाठी ओळखला जातो. नागपूर चाळ, विश्रांतवाडी आणि येरवडा परिसरातून येणारी आणि निघणारी वाहने याच चौकातून जात असल्यामुळे येथे कायम गर्दी राहते. मध्यंतरी वाहतूक पोलिसांनी येथे वाहतूक सुधारण्यासाठी काही उपाय योजना राबवल्या होत्या. त्यामध्ये काही प्रमाणात यश मिळाल्याचे सांगितले गेले होते. मात्र पावसाळा सुरू होताच पुन्हा सर्व व्यवस्था कोलमडताना दिसत आहे.

बुधवारी सायंकाळी पावसात सिग्नल यंत्रणा पूर्णपणे बंद पडली. परिणामी चौकात कोणत्याही दिशेने वाहने थांबत नव्हती. या परिस्थितीत दुचाकी, चारचाकी, बस आणि रिक्षा यांचे मोठे लोंढे जमा झाले. कोणीही कुणाला रस्ता देण्याच्या मनःस्थितीत नसल्याने संपूर्ण चौकात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. वाहनचालक एकमेकांवर ओरडत होते तर काहींनी सोशल मीडियावर थेट पुणे महापालिका आणि वाहतूक विभागाच्या कार्यप्रणालीवर टीका केली.

एक स्थानिक वाहनचालक म्हणाले, “आम्ही याच परिस्थितीत रोज अडकतो. काही काळ सुधारणा झाली होती, पण आता पुन्हा तीच गत. सिग्नल नसेल तर किमान पोलीस तरी उभा असायला हवा ना!”

दरम्यान, वाहतूक विभागाने काही दिवसांपूर्वी शहरातील मुख्य चौकांवर केलेले अनावश्यक ‘पंक्चर’ बंद केले आहेत. या निर्णयामुळे काही ठिकाणी प्रवास सुकर झाला असला, तरी शास्त्रीनगरसारख्या ठिकाणी सिग्नल आणि वाहतूक नियंत्रण व्यवस्थेची नितांत गरज आहे, हे पुन्हा सिद्ध झाले आहे.

हे पण वाचा : हिंजवडी आयटी पार्कचा पिंपरी-चिंचवडमध्ये समावेश नकोच; ग्रामपंचायतींचा तीव्र विरोध

महापालिकेने आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे काम करत अशा महत्वाच्या चौकांमध्ये तात्काळ उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी आता नागरिक करत आहेत. कारण पावसाळा अजून वाढणार आहे, आणि वाहतूक कोंडीची ही समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply