महाराष्ट्रात कार खरेदी महाग! सरकारकडून 10 लाखांची करवाढ लागू, जाणून घ्या नवीन दर?
Maharashtra Vehicle Tax Hike
Maharashtra Vehicle Tax Hike : महाराष्ट्रातील कारप्रेमींना सरकारने मोठा आर्थिक झटका दिला आहे. राज्य सरकारने १ जुलैपासून मोटार वाहनांवरील करात मोठ्या प्रमाणात वाढ केली असून त्याचा थेट परिणाम नवीन कार खरेदी करणाऱ्यांवर होणार आहे. लक्झरी वाहनांपासून ते पर्यावरणपूरक समजल्या जाणाऱ्या सीएनजी व एलपीजी गाड्यांचाही यात समावेश असून त्यांच्यावरही आता अधिक कर भरावा लागणार आहे.
हे पण वाचा : जगातील टॉप 10 अत्याधुनिक लढाऊ विमाने तुम्हाला माहिती आहेत का? वाचा संपूर्ण यादी
मागील काही वर्षांत वाहन खरेदीमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेषतः पुण्यासारख्या शहरात सीएनजी व डिझेल वाहनांचा वापर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सरकारने महसूल वाढवण्यासाठी मोटार वाहन करात सुधारणा करत त्यात १ टक्क्यांपासून ते थेट १० लाख रुपयांपर्यंत वाढ केली आहे.
यापूर्वी आयातीत लक्झरी वाहनांवर जास्तीत जास्त २० लाख रुपयांपर्यंत कर आकारला जात होता. आता ही मर्यादा ३० लाखांपर्यंत नेण्यात आली आहे. उदाहरणार्थ, एखादी लक्झरी आयातीत कार जर दीड कोटी रुपये किमतीची असेल, तर आता तिच्यावर सरळ २० टक्के म्हणजे ३० लाख रुपये कर भरावा लागणार आहे. ही करवाढ लक्षात घेता महागड्या गाड्या खरेदी करणाऱ्यांना आता अधिक विचार करावा लागणार आहे.
सीएनजी व एलपीजी गाड्यांच्या बाबतीतही परिस्थिती वेगळी नाही. १० लाख रुपयांची सीएनजी कार खरेदी करताना यापूर्वी सुमारे ७०,००० रुपये कर लागत होता. आता त्याची रक्कम वाढून ८०,००० रुपये झाली आहे. २० लाखांपर्यंतच्या गाड्यांवर तर सुमारे २०,००० रुपयांची वाढ झाली आहे. महाराष्ट्रात सध्या १७ लाखांहून अधिक सीएनजी आणि एलपीजी वाहने नोंदणीकृत असून या निर्णयाचा मोठा परिणाम सामान्य गाडीरसिकांवर होणार आहे.
सरकारच्या नव्या धोरणानुसार पेट्रोल वाहनांवर ११ ते १३ टक्क्यांपर्यंत तर डिझेल वाहनांवर १३ ते १५ टक्क्यांपर्यंत कर आकारला जाईल. दरवाढीनंतर वाहन डिलर्स आणि ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून पुण्यातील अनेक शोरूममध्ये ग्राहकांची चौकशी कमी झाल्याचे डिलर्स सांगत आहेत.
मात्र, या सर्व दरवाढीच्या गदारोळात सरकारने एक सकारात्मक निर्णय घेतला आहे. पर्यावरणपूरक आणि शाश्वत वाहतुकीला चालना देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांवर पूर्वीप्रमाणेच करसवलत कायम ठेवण्यात आली आहे. म्हणजेच इलेक्ट्रिक कार घेणाऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
हे पण वाचा : तारक मेहता शोमधून बबिताच एक्झिट? अभिनेत्रीचा स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाली…
राज्य सरकारच्या अंदाजानुसार, या नव्या करवाढीमुळे २०२५-२६ या आर्थिक वर्षात सुमारे १७० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळेल. त्याचबरोबर ७५०० किलोपर्यंतच्या हलक्या वाहनांवर लागू केलेल्या नवीन ७ टक्के करामुळे आणखी ६२५ कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे.
