कोट्यवधी कर्मचाऱ्यांना दिलासा! आता PF क्लेमसाठी चेक, पडताळणीची गरज नाही; EPFO चे नवीन नियम जाणून घ्या
EPFO New Rules | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ही देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. अलीकडच्या काळात EPFO ने आपल्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले असून, यामुळे सदस्यांना अनेक सुविधा अधिक सुलभ आणि जलद मिळणार आहेत. हे बदल प्रामुख्याने PF क्लेम, यूएएन व्हेरिफिकेशन आणि बँक खात्याच्या पडताळणीसंदर्भात आहेत. या बदलांमुळे कर्मचाऱ्यांना ‘ईज ऑफ लिव्हिंग’ तर कंपन्यांना ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’चा अनुभव मिळणार आहे.
केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी अलीकडेच EPFO सदस्यांसाठी एक नवीन डिजिटल सेवा सुरू केली आहे. या नव्या सेवेनुसार, सदस्य आता फेस ऑथेंटिकेशनच्या मदतीने आपला युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) तयार किंवा सक्रिय करू शकतात. उमंग (UMANG) मोबाइल अॅपद्वारे ही सेवा उपलब्ध असून, नव्याने नोकरदार असलेल्या व्यक्तीसाठी नियोक्ताही आधारवर आधारित फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून UAN जनरेट करू शकतो. तसेच, ज्या सदस्यांचा UAN आधीपासून आहे पण त्यांनी तो अद्याप सक्रिय केलेला नाही, ते देखील आता उमंग अॅपद्वारे सहजपणे UAN अॅक्टिव्हेट करू शकतात.
PF क्लेम अधिक सुलभ-
पूर्वी EPFO कडून पीएफ क्लेम करताना अर्जदारांना आपले बँक खाते तपशील सिद्ध करण्यासाठी रद्द केलेल्या चेकचा फोटो किंवा पासबुकची फोटोकॉपी अपलोड करणे आवश्यक होते. परंतु, आता हे नियम रद्द करण्यात आले आहेत. याचा अर्थ असा की, आता अर्ज करताना या कागदपत्रांची गरज भासत नाही. यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेळेची बचत करणारी झाली आहे.
तसेच आधी अर्जदाराच्या बँक खात्याची तपासणी करून नियोक्त्याने त्याला मंजुरी देणे अनिवार्य होते. ही प्रक्रिया अनेक वेळा विलंबाला कारणीभूत ठरायची. आता EPFO ने हा नियम हटवला आहे. त्यामुळे कोणताही कर्मचारी स्वतंत्रपणे पीएफ क्लेम करू शकतो आणि नियोक्त्याची मान्यता आवश्यक राहिलेली नाही. हा बदल कर्मचाऱ्यांच्या सोयीचा असून, त्यांना आपले पीएफ पैसे त्वरित मिळण्यास मदत होणार आहे.
काय फायदा होणार?
हे तिन्ही बदल EPFO च्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. यामुळे कोट्यवधी कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्याशी संबंधित सेवा जलद, पारदर्शक आणि त्रासमुक्त पद्धतीने मिळू शकणार आहेत. तसेच नियोक्त्यांवरचा कागदपत्रांचा भारही कमी होणार आहे. EPFO ने या सेवांमुळे ग्राहक अनुभव सुधारण्यास प्राधान्य दिले असून, भविष्यात आणखी काही सुधारणा अपेक्षित आहेत.
