पुणे-नाशिक प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासा! ‘या’ ठिकाणी मिळाली उड्डाणपुलाला मंजुरी…वाचा सविस्तर
Pune Flyover:- नाशिक महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी आणि राजगुरुनगर परिसरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तुकाईवाडी चौकातील धोकादायक वाहतूक, वारंवार होणाऱ्या अडचणी आणि पावसाळ्यात होणाऱ्या पाण्याच्या साचण्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. आता या सर्व समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. तुकाईवाडी चौकात लवकरच उड्डाणपूल आणि उंच रस्ता बांधण्यात येणार असून, यामुळे वाहतूक सुलभ होईल आणि अपघाताचा धोका कमी होईल.
पुणे-नाशिक महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर या मार्गालगत अनेकांनी व्यवसाय सुरू केले. स्थानिक शेतकऱ्यांनी शेतीच्या जोडीला कर्ज काढून हॉटेल्स, लॉजिंग आणि इतर व्यवसाय उभारले. त्यामुळे सध्याचा रस्ता तसाच ठेवून, फक्त भुयारी मार्ग करून वाहतुकीसाठी वळण द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. पण प्रशासनाने हा प्रस्ताव फेटाळून उड्डाणपुलाचा पर्याय स्वीकारला आहे. कारण सध्या असलेला भुयारी मार्ग पुरेसा उपयोगी ठरत नाहीये आणि तो नेहमी पाण्याखालीच असतो.
कसा आहे हा संपूर्ण प्लॅनिंग?
महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी सांगितले की, चासकमान कालवा ते खेड घाटाच्या पायथ्यापर्यंत सुमारे 1.8 किलोमीटरचा रस्ता उंच केला जाणार आहे. तुकाईवाडी चौकात साडेपाच मीटर उंचीचा उड्डाणपूल उभारण्यात येईल. या पुलाच्या दोन्ही बाजूंना रस्ते देखील उंच केले जातील, आणि वाहतुकीसाठी सोयीचे होण्यासाठी दोन्ही बाजूंना उपरस्ते म्हणजेच सर्व्हिस रोडही बांधले जातील.
या संपूर्ण प्रकल्पासाठी तब्बल ४० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून २५ जून रोजी ठेकेदार कंपनीला अधिकृतपणे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवलं गेलं आहे.
आजमितीला तुकाईवाडी हद्दीत तयार केलेला भुयारी मार्ग फक्त कागदावर उपयोगी वाटला असला, तरी प्रत्यक्षात तिथे पावसाचे पाणी साचून रस्ता खराब झाला आहे. काही ठिकाणी तर खड्डे इतके मोठे झाले आहेत की वाहनचालक त्या मार्गाने जाणं टाळतात. त्याऐवजी ते मोठ्या धोक्याचा सामना करत तुकाईवाडी चौकातूनच वळण घेतात, जे पूर्णपणे अपघाताला आमंत्रण देणारे आहे.
या पार्श्वभूमीवर तुकाईवाडी चौकात उड्डाणपूल आणि उंच रस्त्याचे काम केवळ वाहतूक सुलभ करण्यासाठीच नाही, तर लोकांच्या सुरक्षिततेसाठीही अत्यावश्यक झाले आहे. भविष्यात हा परिसर अधिक सुसज्ज होईल, स्थानिकांना मोठा दिलासा मिळेल आणि वाहतुकीची कोंडी दूर होईल, अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाकडूनही काम वेळेत आणि दर्जेदार व्हावे, हीच स्थानिकांची मागणी आहे.
