पुण्यात ढोलताशा वाद्यांची सुरक्षा धोक्यात! काँग्रेसने PMCकडे मांडली ‘ही’ खास मागणी
Pune Dhol Tasha Teams
Pune Dhol Tasha Teams : गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत नर्तन करत, तालबद्ध नादात उत्सवाला एक वेगळंच तेज देणाऱ्या ढोल-ताशा पथकांसाठी महत्त्वाची मागणी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे. या पथकांना सरावासाठी अधिकृत जागा द्यावी, तसेच वाद्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हे पण वाचा : फक्त सव्वा दोन महिन्यात PMC ला १४०० कोटींचं उत्पन्न! यामागचं कारण जाणून थक्क व्हाल!
गणेशोत्सवात ढोल-ताशांचा आवाज म्हणजे उत्साहाचं प्रतिक. पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेचा तो अविभाज्य भाग ठरला आहे. मात्र मागील काही वर्षांत, विशेषतः गेल्या वर्षी आलेल्या मुठा नदीच्या पुरामुळे अनेक पथकांचे महागडे वाद्ये वाहून गेली. यामुळे या पथकांवर आर्थिक बोजा वाढला. त्याचप्रमाणे सरावासाठी शहरात जागा उपलब्ध नसल्यामुळे अनेक पथकांना निवासी भागात सराव करावा लागतो. परिणामी, स्थानिक नागरिकांचा विरोध वाढतो आहे.
तिवारी म्हणाले, “शहरातील ढोल-ताशा पथकांमुळे गणेश मिरवणूक अधिक भव्य आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध होते. अशा या पथकांना आम्ही गृहित धरू शकत नाही. त्यांना योग्य त्या सुविधा देणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे.”
त्यांनी पुढे सुचवले की, महापालिकेने नदीपात्रात किंवा इतर सार्वजनिक खुल्या जागांमध्ये गाळे तयार करून पथकांना सरावासाठी जागा द्यावी. या जागा वेळेनुसार आरक्षित करता येतील. शिवाय, या वापराबाबत पथकांकडून नाममात्र शुल्क घेतले जाऊ शकते. त्यामुळे महापालिकेलाही उत्पन्नाचा स्रोत मिळेल आणि पथकांनाही निश्चित जागा उपलब्ध होईल.
वाद्यांच्या सुरक्षेसाठी देखील ठोस उपाययोजना व्हाव्यात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. अनेक शाळांमध्ये असलेल्या मोकळ्या खोल्यांचा उपयोग पथकांच्या वाद्यांसाठी ‘स्टोरेज स्पेस’ म्हणून करता येईल, असं त्यांनी सुचवलं. यासाठी महापालिका आणि शैक्षणिक संस्थांमध्ये समन्वय साधण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
हे पण वाचा : सात वर्षांचा संसार, फक्त 15 दिवसात संपला! पुण्यातील घटस्फोट चर्चेत
पुण्याच्या तरुणाईने ढोल-ताशा पथकांच्या माध्यमातून एक सांस्कृतिक चळवळ उभी केली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीचा चेहरामोहराच त्यांनी बदलून टाकला. ही चळवळ जपण्यासाठी आणि पुढच्या पिढीपर्यंत टिकवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने आता पुढाकार घ्यायला हवा, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
