सात वर्षांचा संसार, फक्त 15 दिवसात संपला! पुण्यातील घटस्फोट चर्चेत
Mutual Divorce Pune
Mutual Divorce Pune : लग्नात गाठी स्वर्गात जुळतात, असं म्हणतात. पण त्या गाठी जमिनीवर तुटतानाही पाहायला मिळतात. पुण्यातील एका उच्चशिक्षित दाम्पत्याने सव्वातीन वर्षांच्या तणावानंतर केवळ पंधरा दिवसांत परस्पर संमतीने घटस्फोट मिळवला आणि समाजात चर्चा सुरू झाली – “हा निर्णय एवढा लवकर का घेतला गेला?”
हे पण वाचा : सर्वात जास्त मानधनावर शरद केळकरचा रोखठोक इशारा; म्हणाला, ” माझ्यावर जळू नका…”
नोव्हेंबर २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकलेले सुजय आणि सावनी (नावे बदलली आहेत) हे दोघं सुरुवातीला सुखाने संसार करत होते. मात्र कालांतराने मतभेद वाढले, नातं विसंवादाच्या गर्तेत अडकत गेलं. वाद इतका विकोपाला गेला की, मार्च २०२२ पासून दोघे पूर्णपणे वेगळे राहू लागले.
या दाम्पत्याला मूलबाळ नव्हते. दोघेही नोकरीत स्थिर असून, परस्पर सहमतीने या नात्याचा शेवट करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी त्यांनी ज्येष्ठ वकील अॅड. विजय आगरवाल यांच्यामार्फत पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला.
विशेष बाब म्हणजे, पारंपरिक पद्धतीनुसार परस्पर संमतीने घटस्फोट मिळण्यासाठी सहा महिन्यांचा ‘फेरविचार कालावधी’ अनिवार्य असतो. पण या प्रकरणात, न्यायालयाने तो थेट वगळला.
त्याचे कारणही तितकेच स्पष्ट – सर्वोच्च न्यायालयाच्या २०१७ मधील ऐतिहासिक निर्णयानुसार, जर पती-पत्नी १८ महिन्यांहून अधिक काळ वेगळे राहत असतील, तर फेरविचाराचा अवधी टाळता येतो. पुण्यातील या प्रकरणात सव्वातीन वर्षांचा विभक्त काळ असल्याने, अॅड. आगरवाल, अॅड. श्वेता बराथे आणि अॅड. नयन गिल्डा यांनी त्या निर्णयाचा दाखला देत कालावधी वगळण्याची मागणी केली.
न्यायाधीश बी. डी. कदम यांनी ही मागणी मान्य केली आणि केवळ पंधरा दिवसांच्या आत दाम्पत्याला अधिकृत घटस्फोट मंजूर केला. पतीने पत्नीचं स्त्रीधन व पाच लाख रुपये परत केल्याचंही न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
