पुण्यातील या भागातील वाहतूककोंडीचा प्रश्न कायमचा मिटला, दुमजली उड्डाणपूल मेट्रोसोबत होणार कार्यान्वित
पुणे- पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कोथरूड डेपो चौकात दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.
महामेट्रोकडून पुणे महानगरपालिकेला हा प्रस्ताव देण्यात आला असून, या पुलामुळे पुणे शहराच्या पश्चिम भागातील वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरळीत होण्याची शक्यता आहे.
या प्रस्तावाचा सखोल अभ्यास करून महापालिकेकडून काही आवश्यक सुधारणा आणि सूचना दिल्यानंतर त्याला अंतिम मान्यता देण्यात येणार आहे.महामेट्रोने पुणे शहरात मेट्रो प्रकल्प राबवताना वनाज-रामवाडी मार्ग कार्यान्वित केला असून, प्रवाशांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यानंतर आता वनाज-चांदणी चौक हा विस्तारित मेट्रो मार्ग साकारला जाणार आहे.
राज्य सरकारने या मार्गाला मंजुरी दिली असून, आता केंद्र सरकारच्या अंतिम मान्यतेची प्रतीक्षा आहे. एकदा मंजुरी मिळाल्यानंतर या मार्गाचे काम वेगाने सुरू होणार आहे.
पौड रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. विशेषतः कोथरूड डेपो चौकात ही समस्या अधिक तीव्र असून, येथून मेट्रो देखील जाणार असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला.
पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला आहे. पुणे महापालिकेच्या प्रकल्प विभागाने याआधीच येथे उड्डाणपूल उभारण्याची योजना आखली होती. मात्र, महामेट्रोच्या समन्वयातून हा पूल दुमजली स्वरूपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महामेट्रोकडून या दुमजली उड्डाणपुलाचा प्राथमिक आराखडा तयार करून तो महापालिकेच्या प्रकल्प विभागाला पाठवण्यात आला आहे. अंदाजे ९० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, या प्रकल्पासाठी आर्थिक नियोजन करण्यात येत आहे.
महापालिकेकडून या आराखड्याचा सखोल अभ्यास केला जात असून, आवश्यक त्या सुधारणा सुचवल्यानंतर सुधारित आराखडा अंतिम प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवला जाईल.
हा दुमजली उड्डाणपूल मेट्रो मार्गासोबत समांतर राहणार असून, त्याची लांबी ७१५ मीटर आणि रुंदी १४ मीटर असणार आहे. या पुलामध्ये प्रत्येकी २-२ लेन असतील, ज्यामुळे वाहतुकीला वेग मिळेल आणि कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल.
या उड्डाणपुलामुळे कोथरूड परिसरातील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. या भागातून जाणाऱ्या प्रवाशांना प्रवास अधिक वेगवान आणि सुरळीत होईल. महापालिकेचे मुख्य अभियंता युवराज देशमुख यांनी सांगितले की, या आराखड्याचा सविस्तर अभ्यास करून आवश्यक ते बदल सुचवले जातील आणि त्यानंतर त्याच्या अंमलबजावणीला गती दिली जाईल.
हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडेल. विशेषतः कोथरूडसह संपूर्ण पश्चिम पुणे भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
