October 29, 2026

व्हिडिओ व्हायरल झाला अन् पुण्यातील गुडलक कॅफे बंद! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

0
Goodluck Cafe Pune

Goodluck Cafe Pune

Goodluck Cafe Pune : पुणे शहरातील एफसी रोडवर गेल्या अनेक दशकांपासून तरुणाईचं हॉटस्पॉट ठरलेलं ‘कॅफे गुडलक’ अचानक बंद झालं असून, यामागे सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक धक्कादायक व्हिडिओ कारणीभूत ठरला आहे. या व्हिडिओमध्ये गुडलकच्या प्रसिद्ध बन मस्कामध्ये काचेचे तुकडे आढळल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कॅफेची झडती घेतली आणि गंभीर त्रुटी समोर आल्याने तात्पुरता परवाना निलंबित करत कॅफे सील करण्यात आला आहे.

हे पण वाचा : गणपती दर्शन ते ज्योतिर्लिंग यात्रा, धार्मिक स्थळांसाठी स्वारगेटहून सुरू खास बससेवा!

ही घटना उघडकीस आली ती एका जोडप्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमुळे. त्यांनी सांगितले की, गुडलक कॅफेमधील बन मस्कामध्ये खाण्याच्या दरम्यान त्यांना काचेचा तुकडा आढळला. त्यांनी लगेच त्याचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला. हा व्हिडिओ पाहताच एफडीएने तातडीने दखल घेतली आणि तपासणीचे आदेश दिले.

एफडीएचे सहआयुक्त सुरेश अन्नापुरे यांनी सांगितले की, या तपासणीदरम्यान कॅफेमध्ये अनेक अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळले. स्वयंपाकघरातील टाइल्स तुटलेल्या, डस्टबिन उघडा आणि पाण्याने भरलेला, फ्रिज अत्यंत अस्वच्छ, पिण्याच्या पाण्याच्या चाचणीचा कोणताही रेकॉर्ड नाही, तसेच कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीचे कोणतेही दस्तऐवज उपलब्ध नव्हते. या सगळ्या गोष्टी अन्न सुरक्षा दृष्टीने अत्यंत गंभीर मानल्या जातात.

विशेष म्हणजे, कॅफे गुडलक ही पुण्यातील एक प्रतिष्ठित आणि जुनं कॅफे असून, विद्यार्थी, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांमध्ये ते विशेष प्रसिद्ध आहे. त्यामुळे अशी घटना घडल्याने पुणेकरांमध्ये आश्चर्य आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

हे पण वाचा : प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी! रेल्वेत चोरी-छेडछाड थांबवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

एफडीएने कॅफेच्या बन मस्काचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून, त्याचे निकाल येईपर्यंत पुढील निर्णय घेतला जाणार नाही. मात्र प्रशासनाचा स्पष्ट आदेश आहे की, जबपर्यंत सर्व त्रुटी दूर केल्या जात नाहीत आणि स्वच्छता व अन्न सुरक्षा नियमांचं काटेकोर पालन होत नाही, तोपर्यंत कॅफे पुन्हा सुरू करता येणार नाही.

Leave a Reply