कारच्या डॅशबोर्डवरील ‘हे’ 10 वार्निंग सिग्नल कधीच दुर्लक्षित करू नका, अन्यथा…
Car Warning Signs | कारची योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास पुढे चालून मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागू शकते. गाडीमध्ये काहीही बिघाड होण्याआधीच तिच्या डॅशबोर्डवर विविध वार्निंग सिग्नल दिसतात. अनेकदा हे सिग्नल दुर्लक्षित केले जातात, मात्र हे मोठ्या समस्यांना निमंत्रण देऊ शकतात. योग्य वेळी लक्ष दिल्यास केवळ गाडीच नव्हे, तर तुमचाही सुरक्षित प्रवास सुनिश्चित होतो. आज आपण अशा 10 महत्त्वाच्या वार्निंग सिग्नल्सबद्दल जाणून घेणार आहोत, जे गाडीच्या कार्यक्षमतेसाठी आणि तुमच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. (Car Warning Signs)
‘या’ 10 वार्निंग सिग्नलकडे त्वरित द्या लक्ष
1. इंजिन चेक लाइट
जर डॅशबोर्डवर इंजिन चेक लाइट चालू झाली असेल, तर याचा अर्थ गाडीच्या इंजिनमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे. जर ही लाइट सतत ब्लिंक होत असेल, तर इंजिन मिसफायर होत असल्याची शक्यता असते. वेळेवर लक्ष न दिल्यास इंजिनचे नुकसान होऊ शकते आणि दुरुस्तीचा मोठा खर्च येऊ शकतो.
2. ऑइल प्रेशर लाइट
ही लाइट दिसत असेल, तर याचा अर्थ गाडीच्या इंजिनमधील ऑइल प्रेशर कमी झाला आहे. कमी ऑइल प्रेशरमुळे इंजिनला योग्य प्रकारे ल्युब्रिकेशन मिळत नाही आणि त्यामुळे त्याचे मोठे नुकसान होऊ शकते. लाइट चालू झाल्यावर त्वरित इंजिन ऑइल लेव्हल आणि प्रेशर तपासणे गरजेचे आहे.
3. बॅटरी अलर्ट
जर कारच्या डॅशबोर्डवर बॅटरी वार्निंग लाइट दिसत असेल, तर गाडीची बॅटरी लवकरच डाऊन होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्टार्टिंगमध्ये अडचण येऊ शकते किंवा गाडी अचानक बंद पडू शकते. वेळेवर ही समस्या दूर केली नाही, तर नवीन बॅटरीसाठी मोठा खर्च करावा लागू शकतो.
4. इंजिन टेम्परेचर वार्निंग लाइट
ही लाइट चालू झाल्यास इंजिन गरम होत असल्याचे स्पष्ट होते. वेळेवर इंजिन बंद केल्यास मोठ्या नुकसानीपासून बचाव होऊ शकतो. ओव्हरहीटिंगमुळे रेडिएटर, वॉटर पंप आणि थर्मोस्टॅट खराब होऊ शकतात, त्यामुळे ही लाइट दिसताच इंजिन थंड होईपर्यंत गाडी थांबवावी.
5. एंटी-लॉक ब्रेक वार्निंग (ABS Light)
ही लाइट गाडीच्या एंटी-लॉक ब्रेकिंग सिस्टममध्ये काहीतरी बिघाड दर्शवते. जर ABS नीट काम करत नसेल, तर अचानक ब्रेक लावताना अडचण येऊ शकते आणि अपघाताची शक्यता वाढते.
6. टायर प्रेशर वार्निंग लाइट
गाडीच्या टायरमधील हवा कमी असल्यास डॅशबोर्डवर ही लाइट दिसते. जर टायरमध्ये योग्य प्रमाणात हवा नसेल, तर गाडीच्या हँडलिंगवर आणि मायलेजवर परिणाम होतो. तसेच, टायर फाटण्याचा धोका देखील वाढतो. त्यामुळे ही लाइट दिसताच टायर प्रेशर तपासावे.
7. ट्रॅक्शन कंट्रोल वार्निंग लाइट
ही लाइट गाडीच्या ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टममध्ये बिघाड दर्शवते. ओल्या रस्त्यावर किंवा खराब हवामानात गाडी चालवताना ट्रॅक्शन कंट्रोल अत्यंत महत्त्वाचा असतो. जर ही लाइट चालू असेल, तर वाहन घसरण्याची शक्यता वाढते.
8. फ्यूल इंडिकेटर सिंबल
गाडीतील इंधन संपण्याच्या बेतात असेल, तर ही लाइट डॅशबोर्डवर दिसते. ही लाइट ऑरेंज किंवा पिवळ्या रंगात चमकत असेल, तर लवकरात लवकर गाडीमध्ये इंधन भरून घ्यावे, अन्यथा रस्त्यात गाडी बंद पडण्याची शक्यता असते.
9. सीट बेल्ट रिमाइंडर लाइट
ही लाइट सीट बेल्ट न लावल्यास किंवा सीट बेल्टमध्ये काही बिघाड असल्यास दिसते. हल्लीच्या गाड्यांमध्ये फक्त लाइटच नाही, तर सीट बेल्ट लावण्यासाठी ऑडिओ अलर्ट देखील देण्यात येतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची आहे. (Car Warning Signs)
10. क्रूझ कंट्रोल इंडिकेटर
जर क्रूझ कंट्रोल चालू न करता देखील त्याची लाइट डॅशबोर्डवर दिसत असेल, तर याचा अर्थ सिस्टममध्ये काही समस्या आहे. क्रूझ कंट्रोल नीट कार्य करत नसेल, तर हायवेवर लॉन्ग ड्राईव्हमध्ये समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे ती वेळेवर दुरुस्त करून घ्यावी.
गाडीच्या डॅशबोर्डवरील वार्निंग सिग्नल्स वाहनाच्या मेंटेनन्ससाठी आणि सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. याकडे वेळेवर लक्ष न दिल्यास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते आणि लाखोंचा खर्च उभा राहू शकतो. त्यामुळे डॅशबोर्डवरील कोणत्याही वार्निंग लाइटकडे दुर्लक्ष करू नका आणि गाडी वेळोवेळी सर्व्हिसिंगसाठी द्यावी.
