चाहत्यांना धक्का! जेठालाल आणि बबिता जी सोडणार TMKOC मालिका?, सहकलाकाराने केला मोठा खुलासा
गेली 17 वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय विनोदी मालिकेच्या चाहत्यांना सध्या एका चर्चेने चिंतेत टाकले आहे. या मालिकेतील प्रमुख पात्रं प्रेक्षकांच्या हृदयात खोलवर रुजली आहेत. पण अलीकडेच ‘जेठालाल’ आणि ‘बबिता जी’ या दोन महत्वाच्या पात्रांनी शो सोडल्याच्या अफवा जोर धरू लागल्या, ज्यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे.

या अफवांचं मूळ सध्या सुरू असलेल्या एका ट्रॅकमध्ये आहे. सिरीयलमध्ये ‘भूतनी ट्रॅक’ सुरू असून, या ट्रॅकदरम्यान ‘जेठालाल’ आणि ‘बबिता’ यांचा एकही सीन प्रेक्षकांना दिसलेला नाही. इतकंच नव्हे तर ‘अय्यर’सुद्धा गायब आहे. गोकुळधामसारख्या एकत्रित कुटुंबसदृश वातावरणात हे पात्रं दिसेनासं होणं हे काहीसं विचित्रच वाटतंय. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये एकच चर्चा रंगलीय, हे कलाकार खरंच शोमधून बाहेर पडले का?

समय शाहने सांगितलं सत्य
या सगळ्यावर गोगीची भूमिका साकारणाऱ्या समय शाहने अखेर मौन सोडलं आहे. एका मुलाखतीत समयने सांगितलं की, “मला वाटत नाही की ते शो सोडत आहेत. या सगळ्या अफवा आहेत.” हे वक्तव्य दिल्यानंतर चाहत्यांच्या मनात थोडीशी आश्वासक भावना निर्माण झाली आहे. कारण त्यालाही या गोष्टीची ठोस माहिती मिळालेली नाही.

दुसऱ्या बाजूला, दिलीप जोशी (जेठालाल) आणि मुनमुन दत्ता (बबिता) यांनी यावर काहीच अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे त्यांनी मालिका सोडल्याच्या चर्चा आणखीच वाढल्या आहेत. पण जोपर्यंत निर्मात्यांकडून किंवा कलाकारांकडून अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत ‘शो सोडण्याचा’ निर्णय फक्त एक अफवाच मानायला हवा.
‘या’ कलाकारांनी सोडली मालिका

तारक मेहतामधील जुन्या कलाकारांपैकी आतापर्यंत अनेकांनी मालिका सोडली आहे. त्यापैकी काही प्रमुख कलाकार म्हणजे दिशा वकानी (दयाबेन), भव्या गांधी (टप्पू), जेनिफर मिस्त्री बंसीवाल, राज अनाडकत (टप्पू), शैलेश लोढा (तारक मेहता), गुरुचरण सिंग (सोढी) आणि नेहा मेहता (अंजली) अशी नावे आहेत. या कलाकारांनी मालिका सोडण्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. काहींनी वैयक्तिक कारणं दिली, तर काहींनी निर्मात्यांशी मतभेद असल्याचं सांगितलं. अशात जेठालाल आणि बबिताजी देखील मालिका सोडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय.

