राज्यात २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना यलो आणि रेड अलर्ट
Rain Alert
Rain Alert : राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, हवामान विभागाने पुढील २४ तासांबाबत अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला आहे. विशेषतः मुंबई, कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी अतिमुसळधार पावसाचा यलो आणि रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, असा सल्ला प्रशासन आणि हवामान विभागाकडून देण्यात येत आहे.
हे पण वाचा : आज सोन्याच्या दरात मोठा बदल! १० ग्रॅम २४ कॅरेटसाठी झाली ‘इतकी’ किंमत
मुंबई आणि उपनगरांत गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून, आजपासून पुढील २४ तास हे अधिक धोकादायक ठरणार आहेत. भारतीय हवामान खात्याच्या मते, या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, त्यासोबतच ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहावे आणि शक्य असल्यास घरातच थांबावे, असा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत सध्या किमान तापमान २४ अंश सेल्सियस असून कमाल तापमान २७ अंशांच्या आसपास आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्याने पालिका आणि आपत्कालीन यंत्रणांनी सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कोकणातही पावसाचा जोर कायम असून, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. घाटमाथ्यांवर भूस्खलनाचा धोका असल्याने स्थानिक प्रशासन सतर्क असून, पर्यटकांनी तसेच वाहनचालकांनी या भागात जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय पुणे, नाशिक आणि सातारा जिल्ह्यांतील घाट परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान, विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, अकोला, भंडारा आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मुसळधार पावसाचा धोका लक्षात घेता या जिल्ह्यांतील नदी-नाल्यांचा पाणीपातळी वाढण्याची शक्यता असून, नागरिकांनी पुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हे पण वाचा : आज शेअर बाजार सुरुवातीलाच घसरला! मेटल कमकुवत – IT, HDFC, Infosys मध्ये उसळी
सांगली, कोल्हापूर, जालना, परभणी, नांदेड, लातूर आणि धाराशिव या भागांत मात्र पावसाचा जोर तुलनेने कमी असून, हवामान विभागाने येथे ग्रीन अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवसांत राज्यात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असला, तरी तातडीने काळजी घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
