पुण्यात भक्तांच्या ‘बेडरूम’मध्ये पोहचला बाबा! अॅपद्वारे भक्तांच्या खाजगी क्षणांचे करत होता Video Shoot
Pune News :- पुण्यातल्या बावधन भागात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक कशी होते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. एका तथाकथित बाबाने भक्तांच्या मोबाईलमध्ये हळूच एक खास अॅप डाऊनलोड करून त्यांचा खाजगी जीवनात डोकावण्याचा प्रकार केला. केवळ अंधश्रद्धेच्या आधारे लोकांमध्ये भीती पसरवून, त्यांच्या भावना आणि खासगी आयुष्याचा गैरफायदा घेणाऱ्या या बाबाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
प्रसाद उर्फ दादा तामदार असं या भोंदू बाबाचं नाव असून तो मुळशी तालुक्यातल्या सुसगावमध्ये राहतो. त्याच्याविरुद्ध बावधन पोलीस ठाण्यात ३९ वर्षीय एका तरुण भक्ताने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, तामदार बावधन परिसरात अध्यात्म आणि भाकित सांगण्याच्या नावाखाली लोकांना आकर्षित करत होता. ‘माझ्याकडे दिव्यशक्ती आहे’ असं सांगत तो लोकांना त्यांच्या मृत्यूची भीती दाखवत असे. ‘तुमचा मृत्यू काही महिन्यांत अटळ आहे’ असं सांगून तो भक्तांना मानसिकदृष्ट्या कमकुवत करत होता.
या भीतीमुळे अनेक लोक त्याच्याकडे सल्ला घेण्यासाठी जात असत. तो त्यांच्या समोर एक गंभीर उपाय ठेवत असे व तो म्हणजे “जन्ममृत्यूचा धोका टाळायचा असेल तर तुम्ही एखाद्या प्रेयसी किंवा स्त्रीशी संबंध प्रस्थापित करा.” भक्तांमध्ये गोंधळ निर्माण करणारा आणि त्यांचा विश्वास मिळवणारा हा बाबा त्याच वेळी त्यांच्या मोबाईलमध्ये एक ‘एअर ड्रोइड कीड’ नावाचं लपवलेलं अॅप डाऊनलोड करायचा. हे अॅप त्याला त्या व्यक्तीच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यावर, माईकवर आणि लोकेशनवर नियंत्रण ठेवायला मदत करत होतं.
या अॅपमुळे बाबा भक्तांचं लाईव्ह निरीक्षण करू शकत होता. त्यांना फोन करून, “आज तू कुठे गेलास? काय घातलं आहेस? दिवसभर काय केलंस?” असे प्रश्न विचारून तो त्यांचा विश्वास आणखी दृढ करत होता. खरा धक्का मात्र तेव्हा बसला, जेव्हा काही भक्तांनी बाबाच्या सांगण्यावरून संबंध प्रस्थापित करताना मोबाईल विशिष्ट ठिकाणी ठेवला आणि त्या क्षणांचे व्हिडीओ त्याच अॅपमधून बाबाच्या ताब्यात गेले.
प्रकरण उजेडात कसे आले?
संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं ते एका भक्ताच्या सतर्कतेमुळे. त्याच्या मोबाईलचा अचानक जास्त गरम होणं आणि बॅटरी लवकर संपण्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याने आपला मोबाईल एका सायबर एक्सपर्ट मित्राकडे तपासण्यासाठी दिला. तपासात हे गुप्त अॅप सापडलं आणि बाबाचाच मोबाईलमध्ये हस्तक्षेप असल्याचं समोर आलं. यानंतर इतर काही भक्तांनीही आपले मोबाईल तपासले असता, त्यांच्याही फोनमध्ये तेच अॅप सापडले.
सर्व भक्त एकत्र आले आणि बाबाला जाब विचारला. तेव्हा त्याचा चेहरा उतरला. त्याने गयावया करत तक्रार न करण्याची विनंती केली, पण त्यातील एका तरुणाने पोलिसांना 112 वर कॉल करून सर्व हकीकत सांगितली. पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि बाबाला अटक केली. पोलिस ठाण्यात त्याच रात्री अनेक भक्त जमा झाले होते आणि त्यांनीही आपली फसवणूक झाल्याची कबुली दिली.
पोलिसांनी बाबाचा मोबाईल आणि त्याने वापरलेलं अॅप फॉरेन्सिक तपासासाठी दिलं आहे. यामधून बरेच पुरावे समोर आले असून, त्याच्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बाबाने चित्रीकरण केलेली खासगी दृश्यं कोठे साठवली गेली आहेत, हे शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
