गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्यापेक्षा ‘हा’ व्यक्ती आहे जास्त श्रीमंत; पण अजूनही जगासमोर चेहरा आला नाही
Bitcoin Founder
Bitcoin Founder : भारतात मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे नावाजलेले उद्योगपती आहेत, त्यांची श्रीमंती, यश आणि प्रभाव जगभर मान्य आहे. पण एक व्यक्ती अशी आहे जिने केवळ नावाच्या आधारावरच या दोघांनाही आर्थिकदृष्ट्या मागे टाकले आहे. या व्यक्तीचा चेहरा जगाने आजवर पाहिलेला नाही, ना त्याचं ठोस अस्तित्व सिद्ध झालंय – तरीही त्याची संपत्ती १० लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. या गूढ व्यक्तीचं नाव आहे सातोशी नाकामोतो, बिटकॉइन या क्रांतिकारी डिजिटल चलनाचा निर्माता.
हे पण वाचा : “म्हणून अजूनही आले नाहीत पैसे”? ‘लाडकी बहीण’ हप्त्याबाबत सरकारचा मोठा खुलासा
नाकामोतोने २००८ मध्ये बिटकॉइनचं तांत्रिक दस्तऐवज म्हणजे व्हाईटपेपर प्रसिद्ध केला आणि त्यानंतर २००९ मध्ये बिटकॉइन नेटवर्कचा पहिला ‘ब्लॉक’ माइन झाला. त्यानंतर जगभर डिजिटल चलनाची एक लाट उसळली. या चलनाच्या मागे असलेली ‘ब्लॉकचेन’ नावाची तंत्रज्ञानपद्धती अत्यंत सुरक्षित आणि पारदर्शक असल्यामुळे अनेक देशांनी त्याला वेळोवेळी मान्यता दिली. कालांतराने बिटकॉइनच्या किमतीत प्रचंड वाढ झाली. सध्या एका बिटकॉइनची किंमत जवळपास ९८ लाख रुपये आहे.
संशोधनानुसार नाकामोतोकडे सुमारे १० लाख बिटकॉइन आहेत, जे त्याने सुरुवातीच्या काळात माइन केले होते. ही बिटकॉइन्स आजपर्यंत त्याने कधीही वापरले नाहीत, त्यामुळे ते त्याच्याच मालकीचे असल्याचं मानलं जातं. आज या बिटकॉइन्सची एकूण किंमत अंदाजे १२९ अब्ज डॉलर्स इतकी आहे, जी मुकेश अंबानी (१०९ अब्ज डॉलर्स) आणि गौतम अदानी (८४ अब्ज डॉलर्स) यांच्या एकत्रित संपत्तीलाही मागे टाकते. इतकंच नव्हे, तर ही संपत्ती बिल गेट्स यांच्याही संपत्तीपेक्षा अधिक आहे.
हे पण वाचा : विद्यार्थ्यांचा संताप उफाळला! पुणे विद्यापीठात आंदोलन, विद्यार्थ्यांनी तोडले बॅरिकेट्स
नाकामोतोच्या व्यक्तिमत्त्वाचा नेमका ठाव घेण्याचे अनेक प्रयत्न झाले. विविध तज्ज्ञ आणि पत्रकारांनी शोध मोहीमा राबवल्या, काही जणांनी काही व्यक्तींकडे बोट दाखवलं, पण अधिकृतरीत्या आजवर कुणीही नाकामोतो असल्याचं सिद्ध करू शकलेलं नाही. त्यामुळे आज तो एक रहस्यमय मिथक ठरला आहे – जणू एक अशी कल्पना, जिच्या मागे वास्तविकतेचा धागा असला तरी ओळखीचा चेहरा नाही.
