सर्वात जास्त मानधनावर शरद केळकरचा रोखठोक इशारा; म्हणाला, ” माझ्यावर जळू नका…”
Sharad Kelkar
Sharad Kelkar : मराठी चित्रपट आणि मालिकांचा लोकप्रिय चेहरा शरद केळकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकला आहे. ‘तुम से तुम तक’ या मालिकेमार्फत त्याने टेलिव्हिजनवर पुनरागमन केलं असून, या मालिकेसाठी सर्वाधिक मानधन घेतल्याचं समोर आलं आहे. या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या चर्चांना उत्तर देताना शरदने अत्यंत थेट आणि आत्मविश्वासपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे – “हो, मी सर्वाधिक मानधन घेतलंय… पण माझ्यावर जळू नका!”
शरद केळकरने अनेक हिंदी-मराठी मालिकांमध्ये अभिनयाची छाप पाडली आहे. मोठ्या पडद्यावरही दमदार भूमिका साकारल्यानंतर तो पुन्हा एकदा टीव्हीकडे वळला आहे. त्याच्या पुनरागमनाबाबत चर्चा सुरू असतानाच, ‘सर्वाधिक मानधन’ या मुद्द्यावर सोशल मीडियावर बरीच उलटसुलट मतं मांडली गेली. यावर अखेर शरदने खुद्दच खुलं मत मांडत ट्रोलर्सना चपखल उत्तर दिलं.
IANS या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “जर एखादी व्यक्ती चांगलं कमवत असेल, तर लोकांनी आनंद व्यक्त करायला हवा. त्याऐवजी जळणं, टीका करणं चुकीचं आहे. मी खूप मेहनत घेतली आहे, त्या मेहनतीचं हे फळ आहे.” याच मुलाखतीत त्याने ‘तुम से तुम तक’ या मालिकेबद्दलच्या आठवणीही शेअर केल्या. “स्क्रिप्ट वाचूनच मला वाटलं की ही भूमिका मीच करावी. निर्माता मंडळींनी वेळोवेळी संपर्क साधला आणि शेवटी योग्य वेळ आल्यावर मी होकार दिला.”
शरदने स्पष्ट केलं की, “पुन्हा टीव्हीवर येणं म्हणजे मागे जाणं नाही. उलट, एखाद्या अभिनेत्याला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहणं म्हणजेच त्याच्या प्रतिभेची आणि लोकप्रियतेची कबुली.” ‘तुम से तुम तक’ मालिकेतील स्क्रिप्ट, चित्रीकरणाचा वेळ, कलाकारांमधील समतोल वर्कलोड आणि झी वाहिनीशी असलेली भावनिक नाळ यामुळे त्याने ही मालिका स्वीकारल्याचं तो सांगतो.
हे पण वाचा : कोंबडा आहे ‘या’ दोन देशांचा राष्ट्रीय पक्षी, कधीही न वाचलेलं उत्तर वाचून व्हाल थक्क
या मालिकेचं कथानक मात्र थोडं वेगळं आणि वादग्रस्त ठरलं आहे. 19 वर्षांची अनू आणि 46 वर्षांचा आर्यवर्धन यांच्यातील प्रेमकहाणी ही मालिकेची मुख्य थीम आहे. इतक्या वयोविषयक अंतरामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीची लाट उसळली होती. “ही काय प्रेमकहाणी? वयाचं इतकं अंतर दाखवून काहीही करत आहेत”, अशी टीका अनेकांनी सोशल मीडियावर केली.
