शुभमन गिलच्या Nike जर्सीमुळे BCCIला आर्थिक फटका? 300 कोटींच्या करारावरून वाद
Shubman Gill
Shubman Gill Nike Controversy : भारत-इंग्लंड एजबॅस्टन कसोटी सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावर असतानाच, एक छोटीशी कृती टीम इंडियाच्या कर्णधारासाठी मोठ्या वादाचं कारण ठरत आहे. सामना रंगतदार अवस्थेत असतानाच चौथ्या दिवशी शुभमन गिलने डाव घोषित करण्यासाठी मैदानात संदेश पाठवला. पण त्यावेळी त्याच्या अंगावर असलेली Nike ब्रँडची काळ्या रंगाची जर्सी आता चर्चेचा विषय बनली आहे.
हे पण वाचा : 100 फूट खोल! महाराष्ट्रात उभं राहतंय देशाचं पहिलं बुलेट ट्रेन अंडरग्राउंड स्टेशन
या जर्सीमुळे क्रिकेटच्या मैदानावरील खेळीपेक्षा मैदानाबाहेरील कॉर्पोरेट करार चर्चेत आले आहेत. कारण गिलने जी जर्सी परिधान केली, ती Nike या ब्रँडची होती, आणि BCCI सध्या Adidas सोबत 300 कोटी रुपयांचा अधिकृत करारात आहे. या कराराअंतर्गत Adidas ला भारतीय पुरुष, महिला आणि युवा संघांचं अधिकृत किट तयार करण्याचा आणि खेळाडूंनी फक्त त्याचाच वापर करण्याचा विशेषाधिकार आहे.
शुभमन गिलने ज्या क्षणी जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरला बोलावलं, त्या क्षणी त्याच्या छातीवर झळकणारा Nike चा लोगो कॅमेऱ्याच्या नजरेतून सुटला नाही. सोशल मीडियावर ही दृश्यं व्हायरल झाली आणि लगेचच नेटकऱ्यांच्या चर्चेला उधाण आलं. काहींनी विचारलं, Adidas अधिकृत प्रायोजक असताना गिल Nike का घालतोय? तर काहींनी थेट बीसीसीआयवर कारवाईची मागणी केली.
या सर्व गोंधळामागे एक महत्त्वाचा मुद्दा आहे – शुभमन गिल स्वतः Nike चा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. त्यामुळे जाहिरात करारानुसार तो अनेकदा Nike चे पोशाख वापरतो. मात्र भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करताना त्याच्यावर Adidas च्या करारातील नियम लागू होतात. त्यामुळे त्याने निव्वळ सवयीने घातलेली ही जर्सी आता बीसीसीआयसाठी किचकट प्रश्न बनू शकते.
Adidas आणि BCCI यांच्यातील हा करार 2023 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपदरम्यान सुरू झाला. प्रति सामना सुमारे ७५ लाख रुपयांचा हा व्यवहार, एकूण ३०० कोटींपर्यंत पोहोचतो. या रकमेमुळे हा करार बीसीसीआयसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे गिलच्या एका कृतीमुळे Adidas नाराज झाल्यास, भविष्यातील संबंधांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
हे पण वाचा : पुणेकरांनो खुशखबर! हिंजवडी ते बालेवाडी मेट्रो ‘या’ दिवसापासून धावणार
शुभमन गिलने ‘Just Do It’ म्हणत एक कृती केली खरी, पण तिचे पडसाद आता मैदानाबाहेर उमटू लागले आहेत. मैदानावर मिळालेला यशाचा आनंद गडद सावलीत लपवणारी ही घटना, बीसीसीआय आणि प्रायोजकांमध्ये नव्या चर्चेचं कारण ठरते की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल. क्रिकेट फक्त खेळ उरलेला नाही, तर तो करोडोंच्या करारांचा गुंता बनला आहे, हेच या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
