100 फूट खोल! महाराष्ट्रात उभं राहतंय देशाचं पहिलं बुलेट ट्रेन अंडरग्राउंड स्टेशन
India's Deepest Railway Station
India’s Deepest Railway Station : भारतातील रेल्वे क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठला जात आहे – आणि तोही आपल्या महाराष्ट्रात! वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे सध्या देशातील सर्वात खोल रेल्वे स्थानकाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. हे स्टेशन तब्बल 100 फूट खोल, म्हणजेच जवळपास 10 मजली इमारतीच्या उंचीइतके जमिनीखाली असणार आहे. हे भव्य स्टेशन भारताच्या पहिल्या आणि महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचा भाग आहे.
हे पण वाचा : पुणेकरांनो खुशखबर! हिंजवडी ते बालेवाडी मेट्रो ‘या’ दिवसापासून धावणार
मुंबई-अहमदाबाद या हायस्पीड बुलेट ट्रेनसाठी बीकेसी हे एकमेव भूमिगत रेल्वे स्थानक असणार आहे. या ठिकाणी प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स आणि सर्व्हिस फ्लोअर असे तीन मजले असतील. एकूण ६ प्लॅटफॉर्म, प्रत्येकी सुमारे 415 मीटर लांब, उभारण्यात येणार आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच या प्रकल्पाचा व्हिडीओ शेअर केला असून, या दृष्यांनी नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता आणि कौतुकाचं वातावरण निर्माण केलं आहे.
हा बुलेट ट्रेन प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ मानला जातो. सध्या मुंबई ते अहमदाबाद दरम्यान सुमारे ८ तास लागतो, पण ही बुलेट ट्रेन तोच प्रवास केवळ ३ तासांत पूर्ण करणार आहे. ट्रेनचा कमाल वेग ताशी ३२० किमी असेल. भारतात एवढ्या वेगाने धावणारी ही पहिलीच प्रवासी रेल्वे असणार आहे.
प्रकल्पात एकूण 24 पुल, 7 बोगदे, आणि विशेष आकर्षण म्हणजे 7 किमी लांबीचा समुद्री बोगदा देखील समाविष्ट आहे. होय, ही बुलेट ट्रेन समुद्राच्या पोटातूनही धावणार आहे – जे भारतीय अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण ठरणार आहे.
मुंबई-अहमदाबाद मार्गावरील एकूण 12 प्रस्तावित स्थानकांमध्ये बीकेसी व्यतिरिक्त साबरमती, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भरूच, बिलीमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे ही प्रमुख ठिकाणं असतील. या बुलेट ट्रेनमध्ये 690 प्रवाशांची क्षमता असून, तीन प्रकारचे डबे – फर्स्ट क्लास, बिझनेस आणि स्टँडर्ड क्लास – उपलब्ध असणार आहेत.
या प्रकल्पासाठी जपानच्या सुप्रसिद्ध शिंकानसेन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. हा प्रकल्प केवळ प्रवास वेळ कमी करण्यापुरता मर्यादित नाही, तर तो भारतात गतिशीलता वाढवून आर्थिक प्रगतीचं नवं युग सुरू करणार आहे.
