तरुणाचं लिंग पूर्णपणे नाहीसं झालं होतं… पण डॉक्टरांच्या चमत्कारिक शस्त्रक्रियेनं रुग्णाला दिली नवी उमेद!
Penile Reconstruction Surgery
Penile Reconstruction Surgery : कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारामुळे आपलं संपूर्ण आयुष्य उध्वस्त झालं… पण विज्ञान आणि मानवी प्रयत्नांनी ते पुन्हा नव्याने घडवलं. ही कहाणी आहे राजस्थानमधील एका ३० वर्षीय तरुणाची, ज्याने आठ वर्षांपूर्वी कर्करोगामुळे आपलं लिंग गमावलं होतं. या काळात त्याला सामाजिक, मानसिक आणि वैयक्तिक जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, नागपूरच्या लता मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांच्या कौशल्याने त्याचं जीवनच पालटून गेलं.
हे पण वाचा : सकाळी उपाशीपोटी केली खाल्ली तर शरीरात काय घडतं? वाचा आश्चर्यजनक परिणाम
नागपूर हे आता मध्य भारतातील वैद्यकीय सुविधांचं केंद्र ठरत आहे. उच्च तंत्रज्ञान, अत्याधुनिक यंत्रणा आणि तज्ज्ञ डॉक्टरांमुळे अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया येथे यशस्वीपणे पार पडत आहेत. हीच अनुभूती या तरुणाला आली. नागपूरमध्ये पहिल्यांदाच एकाच टप्प्यात त्याचं कृत्रिम लिंग तयार करण्यात आलं आणि शस्त्रक्रियेद्वारे ते पुन्हा लावण्यात आलं.
या दुर्मीळ आणि अत्यंत गुंतागुंतीच्या मायक्रोव्हॅस्क्युलर शस्त्रक्रियेस तब्बल ९.५ तास लागले. यात डॉक्टरांनी रुग्णाच्या हाताच्या वरच्या भागातील त्वचा, स्नायू आणि रक्तवाहिन्यांचा वापर करून लिंगाची शाफ्ट व मूत्रमार्ग तयार केला. हे सगळं जघन भागात बसवण्यात आलं. रक्तपुरवठा सुरळीत व्हावा, संवेदना टिकून राहाव्यात आणि लिंग कार्यक्षम व्हावं यासाठी सूक्ष्म रक्तवाहिन्या आणि नसा सांधण्यात आल्या.
या टीममध्ये डॉ. जितेंद्र मेहता, डॉ. समीर महाकाळकर, डॉ. अश्विनी पंडितराव आदी डॉक्टरांचा समावेश होता. बधिरीकरणासाठी वेगळी अनुभवी टीम कार्यरत होती. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन देवस्थळे यांनी संस्थात्मक पातळीवर सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या.
विशेष म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया आयुष्मान भारत योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत नि:शुल्क करण्यात आली. त्यामुळे गरजू रुग्णांना आर्थिक अडचणी न येता अत्याधुनिक उपचार घेण्याची संधी मिळत आहे.
