सकाळी उपाशीपोटी केली खाल्ली तर शरीरात काय घडतं? वाचा आश्चर्यजनक परिणाम
Banana Benefits
Banana Benefits : आपल्या रोजच्या जेवणात आपण अनेक वेळा आरोग्यदायी पर्यायांपासून दूर जातो. मात्र काही पदार्थ असे असतात जे सहज उपलब्ध, कमी खर्चिक आणि अत्यंत पोषणमूल्यांनी युक्त असतात. असाच एक चमत्कारी फळ म्हणजे केळं. बहुतेक घरांमध्ये सहजपणे मिळणारं हे फळ चविष्ट असण्याबरोबरच अनेक शारीरिक आणि मानसिक फायद्यांनी भरलेलं आहे.
आहारतज्ज्ञांच्या मते, दररोज फक्त एक केळं खाल्लं, तरी शरीरावर होणारा परिणाम आश्चर्यकारक असतो.
प्रथिने, फायबर, अँटीऑक्सिडंट्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आणि बी ग्रुप जीवनसत्त्वे यांचा भरपूर साठा असलेल्या केळ्यामुळे पचनसंस्थेपासून ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत अनेक फायदे मिळतात.
केळ्यामधील फायबर आणि पेक्टिन हे घटक आतड्यांची हालचाल सुरळीत करतात. ज्यांना पचनाचा त्रास, गॅसेस, पोटफुगी यांसारखी लक्षणं वारंवार जाणवतात, त्यांच्यासाठी केळं एक नैसर्गिक उपाय ठरतो.
केळं हे प्री-बायोटिक गुणधर्म असलेलं फळ आहे, जे आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांचा पोषणस्रोत ठरतं. परिणामी संपूर्ण पचनक्रिया सुरळीत होते आणि शरीर अधिक कार्यक्षम राहतं.
तसेच, केळं हे हृदयासाठी उत्तम फळ मानलं जातं. यामध्ये असणाऱ्या पोटॅशियम मुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. यूएस डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरच्या आकडेवारीनुसार, एका मध्यम केळ्यामध्ये सुमारे ४२२ मिग्रॅ पोटॅशियम असतं, जे रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यास मदत करतं.
केळं खाल्ल्यामुळे ऊर्जा पातळी झपाट्याने वाढते. त्यामुळे दिवसभर थकवा, आलस्य वाटण्याची शक्यता कमी होते. विद्यार्थ्यांसाठी, खेळाडूंना किंवा मानसिक तणावात असलेल्या व्यक्तींसाठी केळं एक नैसर्गिक एनर्जी बूस्टर ठरतं.
त्याचबरोबर केळं हे डिप्रेशन आणि मानसिक थकवा दूर करण्यासाठीही उपयुक्त ठरतं. यामध्ये असलेलं ट्रायप्टोफॅन नावाचं अमिनो अॅसिड, मेंदूमध्ये सेरोटोनिन तयार करण्यात मदत करतं, ज्यामुळे मूड सुधारतो, झोप चांगली लागते आणि चिंता कमी होते. अनेकदा वजन कमी करताना फळांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो, मात्र केळं हे योग्य प्रमाणात घेतल्यास वजन कमी करण्यास देखील मदत करतं.
