पाणी कधीच खराब होत नाही, पण बाटलीवर Expiry Date का असते? जाणून घ्या सत्य!
Boottled Water Expiry Date
Boottled Water Expiry Date : पाण्याशिवाय जीवनाची कल्पनाही अशक्य आहे. माणूस असो, प्राणी असो वा वनस्पती – प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी पाण्याची गरज असते. आजही आपल्या देशात पिण्याच्या पाण्याचा मुद्दा अत्यंत गंभीर असताना, अनेकदा लोकांना बाटलीबंद पाण्यावर छापलेली ‘एक्सपायरी डेट’ पाहून एकच प्रश्न पडतो – शुद्ध पाणी खरंच खराब होतं का?
खरंतर, वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर पाण्याचं स्वतःचं कोणतंही एक्सपायरी डेडलाइन नसतं. स्वच्छ आणि नीट साठवलेलं पाणी अनेक वर्ष टिकू शकतं. पण जेव्हा आपण प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये हे पाणी बंद करतो, तेव्हा चित्र बदलतं.
बाजारात मिळणारं बहुतेक पाणी प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पॅक केलं जातं. या प्लास्टिकमध्ये पॉलीथिलीन टेरेफ्थालेट (PET) नावाचं एक रसायन वापरलं जातं. तापमानात थोडा बदल झाला, उन्हात बाटली राहिली किंवा दीर्घकाळ वापरली गेली तर या प्लास्टिकमधून सूक्ष्म रसायनं पाण्यात मिसळू शकतात. परिणामी, पाण्याची चव बदलू शकते, त्याला विचित्र वास येऊ शकतो, आणि काही वेळा या रसायनांचा मानवी आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.
याच कारणामुळे कंपन्या पाण्यावर ‘एक्सपायरी डेट’ छापतात. ही तारीख खरंतर पाण्याची नाही, तर त्या प्लास्टिक कंटेनरची मर्यादा दर्शवते. एकदा का ही मुदत संपली, की त्या बाटलीमधील पाणी प्यायला योग्य राहात नाही. विशेषतः उन्हाळ्यात प्लास्टिकच्या बाटल्या वाहनांत ठेवलेल्या स्थितीत तापमान वाढल्यावर त्या अधिक वेगाने रासायनिक प्रतिक्रियेला सामोऱ्या जातात.
तज्ज्ञांच्या मते, एकदा उघडलेली पाण्याची बाटली शक्यतो दोन दिवसांत संपवावी. उघड्या बाटलीत हवेतून बॅक्टेरिया प्रवेश करू शकतात. तसेच बाटली हाताळताना जर स्वच्छता पाळली गेली नाही, तरही पाणी दूषित होण्याची शक्यता वाढते.
