लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जूनचा हप्ता आजपासून खात्यात जमा?; तुमचा हप्ता जमा नसेल झाला तर ‘हे’ काम करा
Ladki Bahin Yojna
Ladki Bahin Yojna : पावसाळा सुरू होताच शेतीच्या कामांची लगबग वाढली आहे. अशातच राज्यातील कोट्यवधी महिलांना दिलासा देणारी बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ‘माझी लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्य सरकारकडून ३,६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, उद्यापासून पैसे खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल, अशी अधिकृत घोषणा पवारांनी केली.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “जूनचा हप्ता वितरित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पात्र महिलांच्या खात्यात उद्यापासून पैसे जमा होतील.” यानंतर राज्यभरातील महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी व निकष लागू आहेत. सरकारच्या निदर्शनास आले आहे की, काही महिला सरकारी सेवेत असूनही या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा महिलांनी अर्ज करून मे महिन्याचा हप्ता मिळवला आहे. ही बाब समजल्यावर महिला व बाल विकास विभागाने अर्जांची नव्याने छाननी सुरू केली आहे.
यामुळेच, ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे किंवा सरकारी सेवेत कार्यरत आहेत, अशा महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळणार नाही. शासनाने यासंबंधी स्पष्ट भूमिका घेतली असून, गरजू आणि पात्र महिलांनाच लाभ मिळावा, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
हे पण वाचा : शेतजमिनीसाठी वारस नोंद कशी करावी? ७/१२ वर नाव किती दिवसांत येते, वाचा सविस्तर
दरम्यान, अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास विलंब झाल्याचेही समोर आले आहे. सुमारे एक लाख महिलांच्या खात्यात हप्ता जमा झालेला नाही, आणि यामागचं कारण म्हणजे बँक खात्यांची EKYC अद्याप पूर्ण झालेली नाही. शासनाकडून मिळालेल्या निधीची रक्कम सध्या बँकेकडे ‘पार्ट’ म्हणून अडवली गेली आहे. त्यामुळे ज्या महिलांना अचानक हप्ता येणं बंद झालं आहे, त्यांनी आपल्या बँकेत जाऊन EKYC प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी सूचना अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
