एका मुघल राजकुमारीने डिझाइन केला होता दिल्लीतील ‘चांदणी चौक’, याच्या नावामागेही दडलाय रंजक अर्थ!
दिल्लीतील ऐतिहासिक चांदणी चौक म्हणजे केवळ खरेदी आणि खाण्याचं ठिकाण नाही, तर ते दिल्लीच्या समृद्ध इतिहासाचा एक अमूल्य भाग आहे. आजही या जागेचं सौंदर्य आणि वलय हजारो लोकांना आकर्षित करतं, पण फार थोड्या लोकांना माहित आहे की या प्रसिद्ध बाजारपेठेची रचना मुघल सम्राट शाहजहानच्या मुलीने जहांआरा बेगमने स्वतः केली होती.
चांदणी चौकाची कहाणी

सतराव्या शतकात जेव्हा शाहजहानने आपली राजधानी आग्र्याहून दिल्लीला हलवली, तेव्हा त्याने यमुनेच्या काठावर भव्य लाल किल्ला उभारला. किल्ल्याच्या समोरच्या जागेचा वापर कसा करायचा, यासाठी विचार करत असतानाच, जहांआरा बेगम पुढे आली. तिला खरेदीची आवड होती आणि दिल्लीच्या वेगवेगळ्या बाजारांमध्ये जाणं तिच्या दैनंदिन जीवनाचा भाग होता. तिच्या या आवडीला राजाश्रय मिळाला आणि त्यातूनच जन्म झाला चांदणी चौकाचा. एक सुंदर, नियोजनबद्ध आणि कलात्मक बाजार, जिथे त्या काळात भारतभरातील व्यापारी एकत्र यायचे.
‘चांदणी चौक’ नाव कसं पडलं?
या जागेचं ‘चांदणी चौक’ हे नावही तितकंच अर्थपूर्ण आहे. पूर्वी या चौकाच्या मध्यभागी एक मोठा तलाव होता, ज्यावर रात्री चंद्रप्रकाश पडत असे आणि त्याचं प्रतिबिंब पाण्यात चमकत असे. ही दृश्य इतकी मनमोहक होती की त्या जागेला ‘चांदणी चौक’ म्हणणं अगदी नैसर्गिक वाटलं. आज तलाव नाहीसा झाला असला, तरी त्या नावाचं तेज मात्र टिकून आहे.

चांदणी चौक आज केवळ एक खरेदीचं ठिकाण राहिलेलं नाही, तर ती एक सांस्कृतिक केंद्र बनलेली आहे. या परिसरात विविध धर्मांची धार्मिक स्थळं एकत्र पाहायला मिळतात. गौरी शंकर मंदिर, फतेहपुरी मशीद, शीशगंज गुरुद्वारा आणि सेंट्रल बॅप्टिस्ट चर्च. ही विविधता आणि सहअस्तित्व चांदणी चौकाला एक वेगळी ओळख देतात.

चांदणी चौकमधील खरेदी
खरेदीच्या बाबतीत बोलायचं झालं, तर चांदणी चौक म्हणजे एक सप्तरंगी बाजार. इथे सोने-चांदीपासून ते पारंपरिक कपड्यांपर्यंत आणि मसाल्यांपासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत सर्व काही मिळतं. येथे मिळणाऱ्या वस्तू घाऊक दरात असल्यामुळे छोट्या व्यवसायिकांपासून ते सामान्य ग्राहकांपर्यंत सर्वांच्या पसंतीला उतरतात. पण या खरेदीच्या प्रवासात अरुंद गल्ल्यांमधून वाट काढावी लागते, आणि त्यातही एक मजा असते.

पण चांदणी चौकचा खरा आत्मा जर कुठे सापडतो, तर तो आहे अन्नाच्या दरवळत्या सुगंधात. दरिबा कला भागात जलेबी, कचोरी, छोले भटुरे आणि विविध पारंपरिक मिठाई मिळतात. लोक खास या स्वादासाठी दूरवरून येथे येतात आणि एकदा आल्यानंतर पुन्हा-पुन्हा परत येतात.

