फक्त 2 लाखांचं बजेट आणि 70 लाखांची कमाई …; 1953 मध्ये रिलीज झालेल्या ‘या’ चित्रपटाने जिंकला होता पहिला फिल्मफेअर अवॉर्ड!
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही चित्रपट असे असतात जे काळाच्या पलीकडे जातात आणि काळावर अधिराज्य गाजवतात. असाच एक चित्रपट म्हणजे “दो बिघा जमीन”. या चित्रपटाने केवळ सिनेमाच्या परिघात राहून लोकांचे मन जिंकले नाही, तर त्याने एक सुंदर सामाजिक संदेशही दिला. याच चित्रपटाने भारतात पहिल्यांदा दिला गेलेला फिल्मफेअर पुरस्कार मिळवण्याचा मान मिळवला, आणि त्यामुळे तो आणखीनच ऐतिहासिक ठरतो.
“दो बिघा जमीन”
वर्ष होतं 1953. देशाला स्वातंत्र्य मिळून अवघी काही वर्षे झाली होती, आणि भारतीय माणूस अजूनही जमीन, उपजीविका आणि आत्मसन्मान यांच्यात गोंधळलेला होता. या पार्श्वभूमीवर बिमल रॉय यांनी “दो बिघा जमीन” नावाचा असा चित्रपट निर्माण केला, जो केवळ कलात्मक दृष्टिकोनातूनच नव्हे तर सामाजिक जाणीवेच्या पातळीवरही जबरदस्त ठरला. बलराज सहानी यांचा संवेदनशील अभिनय, निरुपा रॉयची समंजस साथ, आणि गरीब शेतकऱ्याच्या जमिनीवरचा हक्क टिकवण्यासाठीचा संघर्ष याने चित्रपटाला काळजात भिडणारा स्पर्श दिला.
मुख्य कलाकार
अवघ्या 2 लाख रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट, बॉक्स ऑफिसवर तब्बल 70 लाखांची कमाई करून गेला. तेव्हा ही कमाई म्हणजे केवळ आर्थिक यश नव्हे, तर प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करण्याचं प्रमाण होतं. ‘दो बिघा जमीन’ हा शब्द केवळ जमिनीचा तुकडा नव्हता, तो एका शेतकऱ्याच्या आयुष्याचं सार होता. त्याचा घाम, त्याचा हक्क आणि त्याच्या अस्तित्वाचं प्रतीक.
या चित्रपटात बलराज सहानी यांचा अभिनय इतका प्रभावी होता की, त्यांनी भूमिका साकारताना स्वतः खऱ्या शेतकऱ्यांसारखे रस्त्यावर भाजी विकायला देखील बसले होते, जेणेकरून त्यांचा अभिनय वास्तवाशी अधिक भिडेल. त्यांच्या या प्रयत्नांनी चित्रपटाला आणखीनच ताकद दिली. लेखक सलील चौधरी, पॉल महिंद्रा आणि ऋषिकेश मुखर्जी यांनी मिळून एक अशी कथा मांडली जी आजही तितकीच सुस्पष्ट वाटते.
कान्स फिल्म फेस्टिवलमध्येही यश
या चित्रपटाला पहिला फिल्मफेअर पुरस्कार ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ म्हणून मिळाला आणि बिमल रॉय यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा बहुमान मिळाला. इतकंच नाही, तर कान्स फिल्म फेस्टिवलमध्येही या चित्रपटाने भारतासाठी एक मोठं यश मिळवून दिलं. हे केवळ चित्रपटाचं नव्हे तर भारताच्या सिनेसंस्कृतीचं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं पहिलं प्रभावी दर्शन होतं.
आजही IMDb वर या चित्रपटाचं रेटिंग 8.3 आहे, जे सिद्ध करतो की, हा चित्रपट केवळ जुन्या काळातच नव्हे तर आजही मनात घर करतो. तुम्ही हा चित्रपट Amazon Prime Video किंवा YouTube वर पाहू शकता आणि स्वतः अनुभव घेऊ शकता की एका गरीब माणसाच्या जमिनीवरचा संघर्ष कसा जगभर पोहोचला.
