October 29, 2026

तब्बल 12 वर्षांनंतर TMKOC मध्ये परतणार अंजली भाभी? नेहा मेहताचा सोशल मीडियावर मोठा खुलासा!

0
Punelive24 News (11)

टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि लांब चालणाऱ्या विनोदी मालिकांपैकी एक म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. तब्बल 17 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. प्रत्येक घरात हा शो पाहिला जातो आणि त्यातील पात्रं ही फक्त काल्पनिक नाही, तर घरच्यांसारखी वाटतात. पण गेल्या काही वर्षांत अनेक आवडते चेहरे या मालिकेतून एकेक करत निघून जाताना दिसले आणि यामुळे चाहत्यांच्या मनात एक हुरहूर निर्माण झाली आहे.

अलीकडेच जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी आणि बबिता जी म्हणजेच मुनमुन दत्ता यांनीही शो सोडल्याच्या चर्चेला उधाण आले. अद्याप निर्मात्यांकडून यावर कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली, तरी चाहत्यांमध्ये यामुळे खळबळ उडाली आहे. इतक्यातच, आणखी एक माजी कलाकार चर्चेत आली आहे ती म्हणजे नेहा मेहता, जी अनेक वर्षे ‘अंजली भाभी’ म्हणून प्रेक्षकांच्या गळ्यातल्या ताईतासारखी होती.

नेहा मेहताचा खुलासा

नेहा मेहताने अलीकडेच एका मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा या शोमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. “जर असित मोदी सर म्हणाले, तर मी त्यांच्यासाठी काहीही करेन,” असे भावनिक उद्गार तिने काढले. इतकंच नव्हे तर, “प्रेक्षक जर मला पुन्हा अंजली भाभी म्हणून पाहू इच्छित असतील, तर मी त्यासाठी पूर्णपणे तयार आहे,” असंही ती म्हणाली.

नेहा 12 वर्षे या शोचा भाग होती आणि तिने अंजलीची भूमिका इतक्या सहजतेने साकारली होती, की प्रेक्षकांना ती आपलीच घरची वाटायला लागली होती. मात्र 2020 मध्ये तिने शोला निरोप दिला. तेव्हा तिने स्पष्टपणे सांगितले होते की, निर्मात्यांसोबतच्या पगाराच्या समस्या आणि काही गैरसमजांमुळे ती ही भूमिका सोडत आहे.

प्रेक्षकांच्या आशा वाढल्या

तरीही, तिच्या मनात अजूनही त्या काळाची एक सुंदर जागा आहे. ती म्हणाली, “माझ्या सहकलाकारांची आठवण येते का? तर मी म्हणेन, आठवणीत राहण्याची गरजच नाही, कारण ते माझ्या हृदयात आहेत. मी टीव्ही चालू करते, ते तिथे आहेत आणि मी इथे.” अशा शब्दांत नेहाने तिच्या सहकलाकारांबद्दल असलेली आत्मीयता दाखवून दिली.

नेहाचे हे शब्द ऐकून अनेक प्रेक्षकांना पुन्हा एकदा अंजली भाभीच्या पुनरागमनाची आशा वाटू लागली आहे. तिने जेव्हा शोमध्ये काम केले तेव्हाही तिने संयम, सौम्यता आणि देखणे अभिनय दाखवून दिला होता. आता जर निर्माते आणि प्रेक्षक याचं स्वागत करत असतील, तर कदाचित पुन्हा एकदा अंजली आणि तारक मेहताची केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळेल.

Leave a Reply