इक्विटी फंड की इंडेक्स फंड? कशातून मिळेल दुप्पट नफा?, दोन्हीमधील फरक समजून घ्या!
कमाईचा एक हिस्सा गुंतवणुकीत टाकायचा विचार प्रत्येक जण करतो. कारण, अडचणीच्या काळात हीच गुंतवणूक मोठा आर्थिक आधार बनत असते. अशा अनेक जणांकरिता म्युच्युअल फंड हा एक आकर्षक पर्याय ठरत आहे. मात्र इक्विटी की इंडेक्स फंड यातून नेमका कोणता निवडायचा? हे समजून घ्यायचं असेल तर आधी म्युच्युअल फंड या संकल्पनेचा सखोल अर्थ जाणून घेणं गरजेचं आहे.
म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंड म्हणजे असे गुंतवणुकीचे साधन, जिथे हजारो लोकांची छोटी मोठी रक्कम एकत्र केली जाते आणि तो निधी एक अनुभवी फंड व्यवस्थापक वेगवेगळ्या ठिकाणी जसे की, शेअर्स, बाँड्स, सरकारी योजनांमध्ये गुंतवतो. यामध्ये नफा मिळण्याची संधी असते, पण त्याचवेळी काहीशी जोखीमही असते. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना अनेकजण SIP म्हणजेच सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे दरमहा ठरावीक रक्कम गुंतवतात. मात्र लक्षात घ्या, SIP ही गुंतवणूक नाही, तर गुंतवणुकीची एक पद्धत आहे. वास्तविक गुंतवणूक म्युच्युअल फंडाच्या योजनांमधूनच होते.
इक्विटी फंड म्हणजे?

आता प्रश्न असा की, इक्विटी फंड निवडायचा की इंडेक्स फंड? इक्विटी फंड म्हणजे असे फंड जे एका फंड मॅनेजरकडून सक्रियपणे व्यवस्थापित केले जातात. म्हणजेच, त्या फंडामध्ये कुठले शेअर्स घ्यायचे, किती प्रमाणात घ्यायचे, हे सर्व निर्णय तज्ञ घेतात. सेक्टर फंड, थीमॅटिक फंड, मल्टी-कॅप फंड्स हे सर्व इक्विटी श्रेणीत मोडतात. जर बाजार चांगल्या स्थितीत असेल आणि फंड मॅनेजरचा अनुभव उत्तम असेल, तर इक्विटी फंड तुम्हाला 12 ते 15% किंवा त्याहून अधिक परतावा देऊ शकतो.
इंडेक्स फंड म्हणजे?

याच्या उलट, इंडेक्स फंड म्हणजे असे फंड जे कोणत्याही माणसाच्या विश्लेषणावर चालत नाहीत. ते सरळ बाजाराच्या एखाद्या इंडेक्सचा (जसे की Nifty 50 किंवा Sensex) मागोवा घेतात. म्हणजे बाजार वाढला तर फंड वाढेल, आणि घसरला तर तोही घसरेल. यामध्ये मानवी हस्तक्षेप फारच कमी असल्यामुळे खर्चही कमी असतो, आणि पारदर्शकता अधिक असते.
पण यातील परताव्याच्या बाबतीत दोघांमध्ये फरक आहे. इक्विटी फंड तुम्हाला अधिक परतावा देऊ शकतो, पण त्यामागे अधिक जोखीम असते. दुसरीकडे, इंडेक्स फंडात थोडक्याच परताव्याची अपेक्षा करावी लागते, पण ते दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी बेस्ट असतात.

महत्त्वाचं म्हणजे, म्युच्युअल फंड हा संपूर्णपणे करमुक्त पर्याय नाही. अल्पकालीन (1 वर्षाच्या आत) विक्रीवर STCG म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स लागतो, तर दीर्घकालीन (1 वर्षाच्या पुढे) नफ्यावर LTCG म्हणजे लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स आकारला जातो. याशिवाय काही फंडांमध्ये लाभांश वितरणावरही कर आकारला जातो. म्हणजे फक्त ‘टॅक्स फ्री’ म्हणून म्युच्युअल फंडकडे पाहणं चूक ठरेल.
तर तुम्हाला जर थोडीशी अधिक जोखीम घेऊन वेगवान परतावा हवा असेल, तर इक्विटी फंड निवडावा. पण तुम्ही दीर्घकालीन, आणि कमी जोखमीच्या गुंतवणुकीच्या शोधात असाल आणि तुमचं प्राथमिक उद्दिष्ट भांडवल वाढवणं असेल, तर इंडेक्स फंड ही अधिक शहाणपणाची निवड ठरेल. शेवटी, गुंतवणूक तुमच्या गरजा, ध्येय आणि धैर्यावर अवलंबून असते.

