भारत टॉप 10 मध्येही नाही! शिक्षणाच्या बाबतीत ‘या’ देशांनी गाठला शिखर, अमेरिका-UK लाही टाकलं मागे
जगात शिक्षण ही एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना मानली जाते, आणि बर्याचदा आर्थिक विकासाशी तिचं थेट नातं समजलं जातं. पण अलीकडील काही अहवाल अशा समजुतींना आव्हान देत आहेत. कारण विकासाच्या शर्यतीत आघाडीवर असणारे काही देश शिक्षणाच्या बाबतीत मागे पडताना दिसतात, आणि जे लहान किंवा तुलनेने कमी प्रसिद्ध देश आहेत, ते या यादीत आघाडीवर पोहोचले आहेत.
कॅनडाने मारली बाजी

OECD (Organisation for Economic Co-operation and Development) च्या ताज्या अहवालात एक अत्यंत महत्त्वाची बाब समोर आली आहे. जगात सर्वाधिक शिक्षित देश म्हणून कॅनडाने बाजी मारली आहे. या देशात तब्बल 59.96% लोकांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं आहे. म्हणजेच, दोनपैकी एक व्यक्ती ही विद्यापीठ किंवा महाविद्यालयात शिकलेली आहे. कॅनडासारख्या देशात शिक्षणाचा पाया केवळ चांगला नाही, तर सर्वसामान्य नागरिकांसाठी तो सहज उपलब्ध आहे.
जपान

दुसऱ्या क्रमांकावर जपान आहे, जिथे 52.68% नागरिकांनी उच्च शिक्षण घेतलं आहे. जपान हा देश अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. शिस्त, नविन तंत्रज्ञान, आणि आता उच्च शिक्षणाची ही आकडेवारीही त्यात भर टाकते. त्याच्या पाठोपाठ, लक्झेंबर्ग या छोट्याशा देशाने तिसरा क्रमांक पटकावला आहे, ज्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आकाराने लहान आणि लोकसंख्येने मर्यादित असलेला हा देश शिक्षणाच्या बाबतीत मात्र मोठ्या देशांना मागे टाकतो.
दक्षिण कोरिया आणि इस्रायल
दक्षिण कोरिया आणि इस्रायलसारखे अत्याधुनिक देश चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. या देशांमध्ये तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाचं वर्चस्व आहेच, पण त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातही ते आघाडीवर आहेत.

अमेरिका आणि ब्रिटनसारखे देश मात्र या शर्यतीत अपेक्षेपेक्षा मागे आहेत. अमेरिका सहाव्या स्थानावर आहे तर ब्रिटन आठव्या स्थानावर. या गोष्टीकडे पाहताना हे स्पष्ट होते की आर्थिक सामर्थ्य असलं तरी शिक्षणात नेतृत्व मिळवणं ही एक वेगळीच लढाई आहे.

यादीत भारताचे नावच नाही
भारतातील स्थिती पाहता, ती काहीशी निराशाजनक वाटते. कारण भारत पहिल्या 10 सर्वाधिक शिक्षित देशांच्या यादीत नाही. सध्या भारतात फक्त 20.4% लोकांनी महाविद्यालयीन किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. खरं तर, भारतात उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांची संख्या प्रचंड आहे, पण तरीही जागतिक टक्केवारीत आपण खूपच मागे आहोत. देशातील केरळ राज्य हा शिक्षणाचा आदर्श नमुना मानला जातो, पण दुसरीकडे अनेक राज्यं अजूनही शिक्षणाच्या मूलभूत सुविधांपासून दूर आहेत.

जगभरात फक्त 39% लोक विद्यापीठ किंवा महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतात. हे प्रमाण जितकं कमी वाटतं, तितकंच ते विचार करायला लावणारं आहे. कारण आपण डिजिटल युगात जगतो, परंतु अजूनही बहुसंख्य लोक उच्च शिक्षणापासून वंचित आहेत.
