October 29, 2026

पुण्यातील गुन्हेगारीवर आळा! लवकरच 1000 नव्या पोलिसांची भरती होणार

0
Pune Police Recruitment 2025

Pune Police Recruitment 2025

Pune Police Recruitment 2025 : झपाट्याने वाढणाऱ्या पुणे शहरासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहरात लवकरच एक हजार नव्या पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होणार असून, हे मनुष्यबळ पुणे पोलिस दलात कार्यरत होणार आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी ही माहिती दिली. शहराचा विस्तार आणि वाढत्या रहदारीच्या पार्श्वभूमीवर ही भरती अत्यंत आवश्यक ठरत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

हे पण वाचा : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! पुण्याला पाणी देणारी चारही धरणं भरभरून भरली

सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी भागात आनंदनगर पोलीस चौकीची नवी इमारत उभारण्यात आली असून तिचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले की, “महाराष्ट्र पोलीस दलात एकूण २० हजार पोलिसांची भरती सुरू असून, त्यातील १ हजार पोलीस पुणे शहरासाठी देण्यात येणार आहेत. या सर्वांची सध्या प्रशिक्षण प्रक्रिया सुरु आहे. शहरातील कायदा-सुव्यवस्था टिकवण्यासाठी, तसेच वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी हे मनुष्यबळ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.”

पूर्वी सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांना तक्रारींसाठी हवेली पोलीस ठाण्यापर्यंत जावे लागायचे. मात्र आता सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याची निर्मिती झाल्यामुळे या भागाचा समावेश शहर पोलिस हद्दीत करण्यात आला आहे. खास बाब म्हणजे, नव्याने उभारलेल्या ठाण्याच्या इमारतीत सायबर पोलीस ठाणाही स्थापन करण्याचा प्रस्ताव असून, त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आमदार माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केले.

हे पण वाचा : शुभमन गिलच्या Nike जर्सीमुळे BCCIला आर्थिक फटका? 300 कोटींच्या करारावरून वाद

शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन गृहविभागाने पुण्यासाठी सात नवीन पोलीस ठाण्यांनाही मंजुरी दिली आहे. तसेच, शहरभर सीसीटीव्ही यंत्रणा मजबूत करण्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, “मनुष्यबळ, यंत्रणा आणि ठाणी वाढवून कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यात येत आहे.”

Leave a Reply