प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी! पुणे विमानतळावर ‘ही’ सेवा पुन्हा सुरु
Pune Airport Porter Service
Pune Airport Porter Service : हवाई प्रवासाला सज्ज असलेल्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या सोयीसाठी ‘हमाल सेवा’ म्हणजेच सामान वाहून नेण्याची सुविधा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा बंद झाल्यापासून अनेक प्रवासी त्यांच्या जड बॅगा, सुटकेस, साहित्य घेऊन त्रस्त होते. आता हीच अडचण दूर करत विमानतळ प्रशासनाने पुन्हा एकदा ही सुविधा कार्यान्वित केली आहे.
हे पण वाचा : पुणेकरांना दिलासा! मेट्रो सेवा होणार वेगवान, ताफ्यात आणखी १२ गाड्यांचा समावेश होणार
विमानतळावर ‘मीट अँड ग्रीट’ आणि ‘पोर्टर’ सेवा (हमाल सेवा) २०२१ मध्ये प्रथम सुरू करण्यात आली होती. या सेवेसाठी २०० रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र, त्यावेळी प्रवाशांकडून अपेक्षेइतका प्रतिसाद न मिळाल्यामुळे काही काळातच ती सेवा बंद करण्यात आली होती. पण आता, प्रवाशांची वाढती संख्या आणि त्यांच्या गरजांचा विचार करून ही सेवा पुन्हा नव्या रूपात पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
पुण्यातून देशांतर्गतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांनाही भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विमानतळावर दररोज हजारो प्रवासी ये-जा करत आहेत. अशा वेळी जड सामान घेऊन चालणे, लांब अंतर पार करणे अनेकांसाठी जिकीरीचे ठरत होते. विशेषतः वयोवृद्ध, अपंग, महिलांसाठी ही समस्या अधिक तीव्र होती. हीच गरज ओळखून विमानतळ प्रशासनाने नवे मनुष्यबळ नियुक्त करून हमाल सेवा पुन्हा कार्यान्वित केली आहे.
विमानतळाच्या नवीन टर्मिनल भागात दोन केंद्रांवर ही सेवा उपलब्ध असून, टॅक्सी स्टँडपासून थेट टर्मिनल गेटपर्यंत हमाल तुमचे सामान घेऊन जातील. या सेवेचा लाभ घ्यायचा असल्यास प्रवाशांना संबंधित केंद्रावर संपर्क साधावा लागेल.
या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. प्रवाशांच्या चेहऱ्यावरचा हलकाच हसू आणि आरामदायी सुरुवात हा या सेवेचा खरा यशमंत्र मानला जात आहे. पुण्याचे विमानतळ दिवसेंदिवस सुविधा संपन्न होत असतानाच, ‘मानवी स्पर्श’ असलेल्या अशा सेवांमुळे प्रवासाचा अनुभव अधिक सौम्य आणि आनंददायी होईल, याची खात्री प्रवाशांना वाटतेय.
संतोष ढोके, संचालक, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, “प्रवाशांच्या सोयीसाठी ही सेवा पुन्हा सुरू केली असून, त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ नेमण्यात आले आहे. प्रवाशांचा अनुभव सुखद व्हावा, हाच आमचा हेतू आहे.”
