October 30, 2026

पुणेकरांना दिलासा! मेट्रो सेवा होणार वेगवान, ताफ्यात आणखी १२ गाड्यांचा समावेश होणार

0
Pune Metro Expansion

Pune Metro Expansion

Pune Metro Expansion : पुणे शहराच्या वाहतुकीला नवे बळ देण्यासाठी आणि मेट्रो सेवेच्या विस्ताराला गती देण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रस्तावित मेट्रो मार्गांसाठी १२ नव्या वातानुकूलित गाड्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी तब्बल ४३०.५३ कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत या गाड्या देशातच तयार केल्या जाणार आहेत. टीटागढ रेल सिस्टीम लिमिटेड आणि टीटागढ फिरेमा या दोन नामवंत कंपन्यांना गाड्यांचे डबे तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. पुढील अडीच वर्षांत या गाड्या महामेट्रोकडे हस्तांतरित केल्या जातील.

हे पण वाचा : पुण्यात आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा! थेट ऑलिम्पिक प्रवेशाची संधी; ५० देशांचे स्पर्धक होणार सहभागी

केंद्र व राज्य सरकारकडून पीसीएमसी ते निगडी या दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो मार्गिकेच्या विस्ताराला मंजुरी मिळाल्यानंतर त्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. तसेच स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गिकेसाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच ठेकेदाराची निवड होणार आहे. या दोन्ही मार्गिकांसाठी नव्या मेट्रो गाड्यांची आवश्यकता असल्याने महामेट्रोने आधीच वापरात असलेल्या कंपन्यांशीच पुन्हा करार केला आहे.

या नव्या मेट्रो गाड्यांची रचना देखील अत्याधुनिक असेल. प्रत्येक गाडीमध्ये दोन स्वतंत्र इंजिन आणि तीन प्रवासी डबे असतील. हे डबे ॲल्युमिनिअम धातूपासून तयार करण्यात येणार आहेत. प्रवाशांसाठी वातानुकूलित सुविधा, स्वयंचलित दरवाजे, उद्घोषणा प्रणाली, आरामदायक आसनव्यवस्था आणि इलेक्ट्रॉनिक माहिती फलक अशी यामध्ये सर्व आधुनिक तांत्रिक सुविधा उपलब्ध असतील.

सध्या स्वारगेट ते पीसीएमसी आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांवर दर आठ मिनिटांनी मेट्रो गाड्या धावत आहेत. मात्र या नव्या गाड्यांमुळे एकूण ताफा ४६ गाड्यांपर्यंत पोहोचणार आहे. परिणामी, मेट्रो सेवा अधिक वेळेवर आणि वारंवार उपलब्ध होणार असून, गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. विशेषतः पीसीएमसी ते निगडी दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना या विस्ताराचा थेट लाभ होणार आहे.

हे पण वाचा : ३४व्या वर्षी तरुणाने केली ४ कोटींची बचत; ‘या’ तरुणाचा पैशाचा प्लॅन एकदा वाचाच

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, पीसीएमसी ते निगडी मार्ग पूर्ण होताच नव्या गाड्यांची सेवा सुरू केली जाईल. गाड्यांची रचना पूर्वीप्रमाणेच असून, याच कंपन्यांशी पुन्हा करार करून वेळ आणि खर्चातही बचत करण्यात आली आहे.

Leave a Reply