October 29, 2026

ससूनमध्ये ऑनलाईन नोंदणी सुरू! एका क्लिकवर मिळणार रुग्णाचा सारा वैद्यकीय तपशील; जाणून घ्या कसं ते?

0
Sassoon Hospital Online Registration

Sassoon Hospital Online Registration

Sassoon Hospital Online Registration : राज्यातील प्रमुख ससून सर्वोपचार रुग्णालयात आरोग्यसेवेत मोठी डिजिटल झेप घेतली गेली आहे. यापुढे बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची नोंदणी आता पूर्णपणे ऑनलाइन केली जात आहे. त्यामुळे पूर्वी रांगेत उभे राहून, तासन्‌तास तपशील लिहून देण्याचा त्रास संपला आहे. एका क्लिकवर रुग्णाचा वैद्यकीय इतिहास उघडता येत असल्यामुळे ही प्रणाली रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठीही मोठा दिलासा ठरत आहे.

हे पण वाचा : प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी! पुणे विमानतळावर ‘ही’ सेवा पुन्हा सुरु

ससून रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज सुमारे १,७०० रुग्ण उपचारासाठी गर्दी करतात. यापैकी अनेक जण जुन्याच आजारांसाठी पुनरागमन करीत असतात. पूर्वी ही नोंदणी प्रक्रिया कागदोपत्री केली जात असल्याने वेळखाऊ ठरत होती. रुग्णांना रांगेत उभे राहावे लागे, तर कर्मचाऱ्यांना प्रत्येकवेळी सर्व तपशील लिहून घ्यावे लागत. मात्र आता राष्ट्रीय सूचना केंद्राच्या ‘नेक्स्ट जनरेशन ई-हॉस्पिटल’ प्रणालीच्या मदतीने ही नोंदणी संगणकीकृत करण्यात आली आहे.

रुग्णालय प्रशासनाने यासाठी २० संगणक आणि तितकेच प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यातील १८ संगणक थेट बाह्यरुग्ण विभागात कार्यरत असून, उर्वरित मानसोपचार आणि अस्थिव्यंगोपचार विभागात कार्यरत आहेत. यामुळे रुग्णाची नोंदणी काही मिनिटांत पूर्ण होते. विशेष म्हणजे, रुग्णाने दिलेला मोबाईल क्रमांक किंवा विशिष्ट ‘युनिक आयडी’ टाकताच त्याचे नाव, वय, लिंग, आधार क्रमांक यांसह पूर्वीचे उपचार तपशील समोर येतात.

रुग्णांसाठी काय बदलले?
पूर्वी लागणाऱ्या रांगा आता थांबल्या आहेत. नोंदणी जलद होत असल्यामुळे वेळ वाचतो. याचबरोबर पूर्वी केलेल्या तपासण्या, औषधोपचार किंवा शस्त्रक्रियांची माहितीही डिजिटल स्वरूपात डॉक्टरांना उपलब्ध होत असल्याने उपचार अधिक नेमके आणि प्रभावी होत आहेत. या योजनेत पुढच्या टप्प्यात आंतररुग्ण विभागाचीही नोंदणी ऑनलाईन करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया, औषधोपचार, तपासणी अहवाल व बिलांची माहितीही संगणकीय पद्धतीने ठेवली जाणार आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी दिली. सध्या सकाळी ८.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत ही सेवा सुरु असून, सोमवार आणि मंगळवारी रुग्णसंख्या जास्त असते. उर्वरित दिवसांत गर्दी तुलनेने कमी असते.

रुग्णांची नोंदणी करताना घेतले जाणारे तपशील
नाव
मोबाईल क्रमांक
लिंग
वय
आधार क्रमांक

हे पण वाचा : पुणेकरांना दिलासा! मेट्रो सेवा होणार वेगवान, ताफ्यात आणखी १२ गाड्यांचा समावेश होणार

ससून रुग्णालयाच्या या निर्णयामुळे शासकीय आरोग्यसेवेच्या डिजिटायझेशनकडे महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे. एकीकडे आरोग्यसेवा अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होत असताना, दुसरीकडे रुग्णांच्या वेळेची बचत आणि समाधानातही लक्षणीय वाढ झाली आहे.

Leave a Reply