मृत्यूची तारीख सांगून भक्तांना घाबरवत होता; पुण्यात भोंदूबाबाचा पर्दाफाश
Pune Bhondubaba News
Pune Bhondubaba News : पुणे जिल्ह्यातील सुसगाव येथील एका भोंदूबाबाने ‘आध्यात्मिक उपाय’ आणि ‘भविष्य सांगणे’ या नावाखाली भक्तांची केवळ आर्थिक नव्हे, तर मानसिक आणि शारीरिक पातळीवर फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. प्रसाद दादा ऊर्फ बाबा ऊर्फ प्रसाद तामदार (वय २९) या तथाकथित बाबाला पुणे पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या आश्रमावर छापा टाकून अनेक संशयास्पद वस्तू आणि पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
हे पण वाचा : पेशवे की जिजाऊ? पुणे स्टेशन नामांतरावरून पुण्यात वाद, ब्राह्मण महासंघ मैदानात उतरलं!
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या आश्रमातून Solopose 0.5mg, Provanol यांसारख्या गुंगी आणणाऱ्या औषधांच्या गोळ्यांची पाकिटं, दोन आयपॅड, तीन मोबाईल फोन, सिमकार्ड आणि एक पेनड्राईव्ह हस्तगत करण्यात आली आहे. सर्व डिजिटल उपकरणांमध्ये काही अश्लील व्हिडिओ क्लिप्स असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, याची सखोल फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.
अधिक धक्कादायक बाब म्हणजे, या बाबाकडून ‘हिडन अॅप’च्या माध्यमातून भक्तांचे खाजगी क्षण मोबाईलमध्ये चोरून टिपले जात होते. ही माहिती समोर येताच पोलिसांच्याही भुवया उंचावल्या आहेत. बाबाने अनेक भक्तांच्या मोबाईलमध्ये हे अॅप लपवून इन्स्टॉल केले होते, ज्यातून त्यांच्या हालचाली रेकॉर्ड केल्या जात होत्या. यानंतर त्यांना ‘संकट आहे’, ‘उपाय करावा लागेल’ अशा भावनिक गळ्यात अडकवून गुंगीची औषधं देऊन गैरवर्तन केल्याचेही स्पष्ट झाले आहे.
पोलीस चौकशीत आतापर्यंत पाच भक्तांनी बाबाने त्यांच्या विषयी केलेल्या गैरवर्तनाची कबुली दिली आहे. हा बाबा लोकांना सांगायचा, “तुमच्यावर संकट आहे, मी ते स्वतःवर घेतो,” आणि अशा भावनिक खेळीतून त्यांच्या मनात भीती पेरून पुढील कृत्ये घडवत असे. एखादा भक्त विरोध करताच, “तुझ्या मृत्यूची तारीख जवळ आहे,” असे सांगून त्यांना गप्प बसवले जात होते.
हे पण वाचा : पुणे ठरलं देशातील पहिलं डॉल्बी सिनेमा शहर, थेट हॉलिवूडसारखा अनुभव!
या सर्व प्रकारामुळे पुण्यातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या या प्रकारावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सोशल मीडियावरून होऊ लागली आहे. सध्या बाबाची पोलीस कोठडी सुरू असून, पोलिसांकडून त्याच्या डिजिटल उपकरणांची बारकाईने तपासणी केली जात आहे. त्याच्या संपर्कातील इतर लोकांशी संबंध, आर्थिक व्यवहार आणि इतर कोणत्या भक्तांना फसवले गेले आहे का, याचाही तपास सुरू आहे.
