पेशवे की जिजाऊ? पुणे स्टेशन नामांतरावरून पुण्यात वाद, ब्राह्मण महासंघ मैदानात उतरलं!
Pune Railway Station Rename
Pune Railway Station Rename : पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या मुद्द्यावर शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी स्टेशनला ‘थोरले बाजीराव पेशवे’ यांचे नाव देण्याची मागणी केल्यानंतर आता ब्राह्मण महासंघदेखील या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. आनंद दवे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने पुणे स्टेशन परिसरात थेट “थोरले बाजीराव पेशवे रेल्वे स्थानक” असे फलक झळकावले असून, या मागणीला अधिक उग्र रूप मिळाले आहे.
हे पण वाचा : पुणे ठरलं देशातील पहिलं डॉल्बी सिनेमा शहर, थेट हॉलिवूडसारखा अनुभव!
या फलकांद्वारे नामांतराचा आग्रह धरतानाच “पेशवे नावाला विरोध का?” असा थेट सवाल करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर सर्वपक्षीय नेते या विषयावर का गप्प आहेत, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. परिणामी, या मुद्द्याने पुन्हा एकदा पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक पटावर तणाव निर्माण केला आहे.
दरम्यान, या नामांतराच्या मागणीला इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी प्रत्युत्तर देत, स्टेशनचे नाव राजमाता जिजाऊ यांच्या नावाने करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने खोचक पद्धतीने, “कोथरूडच्या बाई, नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा!” असा मजकूर असलेले फलक लावले. त्यामुळे एकप्रकारचा ‘पोस्टर वॉर’ पेटला असून, शहरातील वातावरण अधिकच ढवळून निघाले आहे.
पुणे शहर हे छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, थोरले बाजीराव पेशवे या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा वारसा लाभलेले शहर आहे. शनिवाऱ्याचा वाडा, शनिवार पेठ, पेशवेकालीन रचना यांमुळे पुण्याचा इतिहास पेशव्यांशी घट्ट जोडलेला आहे. बाजीराव पेशवे यांचा पराक्रम आणि रणनीती आजही लष्करी प्रशिक्षणात शिकवली जाते. त्यांनी एकही लढाई न हरता मराठा साम्राज्याचा विस्तार केला, हे अनेकांचे अभिमानाचे कारण आहे. त्यामुळे स्टेशनच्या नामकरणास त्यांचे नाव सुचवले जात आहे.
मात्र, दुसरीकडे पुणे हे जिजाऊ मातेचेही कार्यक्षेत्र राहिले आहे. शिवरायांचे बालपण, संस्कार, स्वराज्याचे बीज याच भूमीत रोवले गेले. त्यामुळे ‘जिजाऊ की पेशवे?’ असा संभ्रम निर्माण झाला आहे.
