पुणे ठरलं देशातील पहिलं डॉल्बी सिनेमा शहर, थेट हॉलिवूडसारखा अनुभव!
Dolby Cinema Pune
Dolby Cinema Pune : पुणेकरांच्या चित्रपटप्रेमात आणखी एक तेजोमय अध्याय जोडला गेला आहे. भारतातला पहिलाच डॉल्बी सिनेमा आता पुण्यात सुरू झाला असून, खराडीमधील सिटी प्राईड मल्टिप्लेक्समध्ये या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या चित्रपटगृहाचे भव्य उद्घाटन गुरुवारी पार पडले. ‘ज्युरासिक वर्ल्ड रीबर्थ’ या हॉलीवूडपटाच्या भव्य प्रदर्शनासह शुक्रवारपासून (५ जुलै) प्रेक्षकांसाठी या नव्या युगाची सुरुवात झाली आहे.
या नव्या डॉल्बी सिनेमामध्ये प्रेक्षकांना एकाच वेळी डॉल्बी व्हीजनच्या प्रखर, जिवंत रंगछटांचा अनुभव तर दुसरीकडे डॉल्बी ॲटमॉसमुळे चहुबाजूंनी भारावून टाकणारा ध्वनी अनुभव मिळणार आहे. थेट अमेरिकेतल्या प्रिमिअर सिस्टिमप्रमाणे हे सिनेमा थिएटर उभारण्यात आले असून, पुणे आता भारतीय चित्रपटविश्वात ‘पहिलं’ डॉल्बी शहर म्हणून गणलं जात आहे.
डॉल्बी लॅबोरेटरीजचे उपाध्यक्ष मायकेल आर्चर यांनी स्पष्ट केलं की, “भारतामध्ये डॉल्बी सिनेमांची साखळी विस्तारण्याच्या आमच्या दीर्घकालीन योजनेतील पुणे हे पहिले महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे भारतीय प्रेक्षकांपर्यंत जागतिक दर्जाचा सिनेमा पोहोचणार आहे.” पुण्याच्या पुढे आता हैदराबाद, बंगळुरू, त्रिची, कोची आणि उलीक्कल या शहरांमध्येही लवकरच डॉल्बी सिनेमा सुरू होणार आहे.
सिटी प्राईड मल्टिप्लेक्सचे संचालक पुष्कराज चाफळकर यांनी अभिमानाने सांगितले, “आमच्या कुटुंबाचा चित्रपट व्यवसायातला प्रवास १९३९ मध्ये एका पडद्याच्या चित्रपटगृहापासून सुरू झाला. आज ४० पडद्यांपर्यंतचा विस्तार झाला आहे. आणि आता देशातील पहिला डॉल्बी सिनेमा सुरू करण्याचा मान मिळाल्यामुळे एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. पुणेकरांच्या दर्जेदार सिनेमाबद्दलच्या प्रेमामुळे हे शक्य झालं.”
हे पण वाचा : पाणी कधीच खराब होत नाही, पण बाटलीवर Expiry Date का असते? जाणून घ्या सत्य!
डॉल्बी सिनेमाच्या वैशिष्ट्यांकडे पाहिलं तर, ड्युअल ४K लेझर प्रोजेक्शन, उजळ आणि तपशीलपूर्ण दृश्ये, वक्राकार पडदे, डायनॅमिक लायटिंग, आरामदायी आसने, कमी व्यत्यय यामुळे प्रेक्षकांना सिनेमाचा अनुभव खऱ्याखुऱ्या घटनांसारखा वाटेल. २डी आणि ३डी चित्रपटांचा थेट डोळ्यांसमोर घडणारा अनुभव हे डॉल्बी सिनेमाचं खास वैशिष्ट्य ठरणार आहे.
