पुणेकरांनो! अमित शहा पुणे दौऱ्यावर; ‘या’ रस्त्यांवर वाहनांची बंदी, वाहतुकीत मोठे बदल
Pune Traffic Update Today
Pune Traffic Update Today : पुणे शहरात आजचा दिवस राजकीयदृष्ट्या आणि वाहतुकीच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आजच्या पुणे दौऱ्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे पुणेकरांनी घराबाहेर पडण्याआधी नक्कीच या बातमीकडे लक्ष द्यावे, अन्यथा अनावश्यक अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो.
हे पण वाचा : मृत्यूची तारीख सांगून भक्तांना घाबरवत होता; पुण्यात भोंदूबाबाचा पर्दाफाश
अमित शहा आज पुण्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. त्यांचा दौरा सकाळपासून सुरू होत असून कोंढवा बुद्रुक येथील जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटर येथे ते प्रथम भेट देतील. त्यानंतर बाळासाहेब देवरस रुग्णालयाची पाहणी करून पीएमएचआरसी हेल्थ सिटीच्या भूमिपूजन सोहळ्यात ते सहभागी होतील. संध्याकाळपर्यंत त्यांचा मुक्काम येरवड्यातील एका खासगी हॉटेलमध्ये राहणार असून संपूर्ण वेळेत सुरक्षा यंत्रणा सतर्क राहणार आहे.
शहा यांच्या दौऱ्याचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासला येथील थोरले बाजीराव पेशवे यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण. या ऐतिहासिक कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचीही उपस्थिती असणार आहे. या ठिकाणी सैन्य अधिकाऱ्यांशी संवाद, कॅडेट्सचे अभिवादन आणि राजकीय संदेश देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे खडकवासला परिसरातही सुरक्षेचे कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.
शहरात आज दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या वेळेत वाहतुकीसाठी काही मार्ग बंद करण्यात आले आहेत. मंतरवाडी फाटा ते खडीमशीन चौक आणि पुढे कात्रज चौकापर्यंत जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच बंडगार्डन विभागातील मोर ओढा सर्किट हाऊस चौक ते आयबी चौकपर्यंतचा मार्ग एकेरी करण्यात आला आहे. यासंदर्भात वाहतूक शाखेचे उपायुक्त हिम्मत जाधव यांनी नागरिकांना पूर्वसूचना दिली असून आवश्यक त्या खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
हे पण वाचा : पेशवे की जिजाऊ? पुणे स्टेशन नामांतरावरून पुण्यात वाद, ब्राह्मण महासंघ मैदानात उतरलं!
दरम्यान, शहरात आज पावसाचीही शक्यता वर्तवली जात असल्याने वाहतूक कोंडीची स्थिती अधिक बिकट होऊ शकते. अनेकांनी सोशल मीडियावर याविषयी नाराजी व्यक्त केली असून, गर्दीचा अंदाज घेता काही भागात रस्ते टाळणेच योग्य ठरेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
