पुण्यात जोरदार पावसाची एंट्री! स्वारगेट, कोथरूड ते हडपसर रस्त्यांवर दोन तासांत साचले पाणी
Pune Rain
Pune Rain : सलग दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी शहरावर अचानक झडप घातली. दुपारी चारच्या सुमारास आकाशात काळे ढग जमले आणि शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये जोरदार सरींनी हजेरी लावली. जवळपास दोन तास चाललेल्या या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले, वाहतूक ठप्प झाली, तर विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत साऱ्यांची धांदल उडाली. हवामान खात्याने पुढील काही दिवस पुण्यात ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींचा अंदाज व्यक्त केला आहे.
हे पण वाचा : पुण्याच्या पर्यटनाची स्मार्ट वाटचाल! एकाच ॲपवर मिळणार १३८ ठिकाणांची संपूर्ण माहिती
गेल्या आठवड्यापासून पावसाने उसंत घेतली होती. जुलैचा दुसरा आठवडा सुरु असूनही समाधानकारक पाऊस झालेला नव्हता. पुणेकर उन्हाच्या चटके सहन करत होते. मात्र बुधवारी सकाळपासूनच वातावरणात बदल जाणवत होता. ढगांची दाटी, उकाडा आणि अधूनमधून येणाऱ्या गार वाऱ्यामुळे पावसाची चाहूल लागली होती. दुपारी चारनंतर काळे ढग दाटून आले आणि अचानक शहरावर पावसाचा शिडकावा झाला.
शिवाजीनगरमध्ये सायंकाळी सहापर्यंत ६ मिमी, तर पाषाणमध्ये ५ मिमी पावसाची नोंद झाली. ग्रामीण भागातील मुळशी तालुक्यातील गिरीवन परिसरात तब्बल ३७ मिमी पावसाची नोंद झाली. शहरातील स्वारगेट, कोथरूड, औंध, वारजे, येरवडा, विश्रांतवाडी, कात्रज, कोंढवा, मुंढवा, धनकवडी, हडपसर, मगरपट्टा आणि एनडीए परिसरातही हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या.
पावसाचा मोठा फटका विद्यार्थ्यांना व नोकरदारांना बसला. शाळा, महाविद्यालयं सुटण्याच्या वेळेला पाऊस सुरू झाल्याने छत्र्या नसलेल्या विद्यार्थ्यांची पुरेपूर भिजण्याची वेळ आली. कार्यालयांतून घरी निघालेल्या लोकांनी रस्त्यावर अडकून पडावे लागले. पाण्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आणि शहरातील अनेक ठिकाणी वाहनांची रांगा लागल्या. पोलिसांना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त मेहनत घ्यावी लागली.
हे पण वाचा : पुण्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर! मनसेचा महापालिकेला थेट इशारा
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील चार ते पाच दिवस पुणे व परिसरात आकाश सामान्यतः ढगाळ राहील. या काळात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता असून, घाटमाथ्यावर काही भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाच्या शक्यता आहेत.
