November 2, 2026

सर्व  पुणेकरांना मिळकत करात ४०% सूट मिळणार? आमदार रासने यांची मागणी विधानसभेत गाजली

0
Hemant Rasane

Hemant Rasane

Hemant Rasane : पुणेकरांना मिळकत करामध्ये दिलासा मिळावा, अशी ठाम मागणी कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी बुधवारी विधानसभेत केली. सध्या पुणे महापालिकेकडून स्वतःच्या राहत्या घरावर मिळकतधारकांना ४० टक्के करसवलत दिली जाते. मात्र, त्या मिळकतीत भाडेकरू राहत असल्यास ही सवलत रद्द केली जाते. हा दुजाभाव थांबवून सर्व मिळकतधारकांना सरसकट सवलत मिळावी, अशी ठोस भूमिका रासने यांनी मांडली.

हे पण वाचा : पुण्यात जोरदार पावसाची एंट्री! स्वारगेट, कोथरूड ते हडपसर रस्त्यांवर दोन तासांत साचले पाणी

नगरविकास विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान रासने यांनी ही मागणी उपस्थित केली. पुणेकरांच्या रोजच्या जीवनाला स्पर्श करणाऱ्या या मुद्द्यावर चर्चा करताना त्यांनी आणखी काही महत्त्वाचे प्रश्नही सभागृहात मांडले. त्यात प्रमुखतः पुण्यातील टीडीआर प्रक्रिया, वाड्यांच्या पुनर्विकासाला अडथळे ठरणारे नियम आणि शहरातील सरकारी वसाहतींची दयनीय स्थिती यांचा समावेश होता.

रासने म्हणाले की, “पिंपरी-चिंचवड महापालिकेत टीडीआर केवळ दोन महिन्यांत मिळतो, पण पुण्यात त्याच प्रक्रियेसाठी दोन वर्षे लागत आहेत. ही दिरंगाई विकासकामांना खोळंबवणारी आहे.” यासोबतच, पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या अनेक जुन्या वाड्यांना यूडीसीपीआरमधील एक मीटर साइड मार्जिनचा नियम अडसर ठरत असून, तो शिथिल केला जावा, अशी मागणीही त्यांनी केली.

कसबा मतदारसंघातील ४४ शासकीय वसाहतींची स्थिती अत्यंत खराब असून, त्यांच्यासाठी निधीच उपलब्ध नसल्याने पुनर्विकास रखडला आहे. अशा ठिकाणी PPP (Public Private Partnership) मॉडेलच्या माध्यमातून विकासाचे काम मार्गी लावता येईल, असा पर्याय रासने यांनी सुचवला.

पुणेतील वाहतूक कोंडी हा शहरातील नागरिकांसाठी मोठा डोकेदुखीचा विषय बनला आहे. रासने यांनी शनिवारवाडा-स्वारगेट आणि सारसबाग-शनिवारवाडा या प्रस्तावित भुयारी मार्गांना गती देण्याची गरज अधोरेखित केली. मेट्रो स्टेशनपासून ५०० मीटर परिसरात ‘T.O.D.’ नियम लागू असून, त्या झोनमध्ये एफएसआय वाढवून विकासास चालना दिली जात आहे. मात्र, या सगळ्या योजनेला पूरक ठरेल असा सर्वंकष वाहतूक आराखडाच अद्याप तयार झालेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

हे पण वाचा : पुण्याच्या पर्यटनाची स्मार्ट वाटचाल! एकाच ॲपवर मिळणार १३८ ठिकाणांची संपूर्ण माहिती

दरम्यान, वाहतूक कोंडीसंदर्भात विधानसभेत चर्चा होत असतानाच मंत्री दादा भुसे यांनी मोठी घोषणा केली. पुणे शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधी, वाहतूक पोलीस, महापालिका आणि अन्य विभाग प्रमुखांची विशेष बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत पुण्यासाठी तयार करण्यात आलेल्या वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी, रिंगरोड प्रकल्प, सहापदरी उड्डाणपूल, ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग आणि मेट्रोच्या विस्तार यावर चर्चा होणार आहे.

Leave a Reply