October 29, 2026

UPSC तयारी करणाऱ्या पुणेकर मुलीने झोपून कमावले ९ लाख; जाणून घ्या कशी मिळाली नोकरी?

0
Sleep Internship India

Sleep Internship India

Sleep Internship India : परीक्षेची तयारी करताना झोप ही ‘विलास’ मानली जाते, पण पुण्यातील एका तरुणीने हीच झोप आपले यशाचे साधन बनवली आहे. ‘स्लीप इंटर्नशिप’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमात सहभागी होऊन पूजा माधव वाव्हल या तरुणीने तब्बल ९.१ लाख रुपयांचे बक्षीस पटकावले आहे. ही इंटर्नशिप पूर्ण करून तिने देशातील ‘स्लीप चॅम्पियन ऑफ द इयर’ हा बहुमानही मिळवला आहे. विशेष म्हणजे पूजा यूपीएससी परीक्षेची तयारी करत असून, ती यशस्वीपणे झोपेच्या ‘स्पर्धेत’ही अव्वल ठरली आहे.

हे पण वाचा : ससूनमध्ये ऑनलाईन नोंदणी सुरू! एका क्लिकवर मिळणार रुग्णाचा सारा वैद्यकीय तपशील; जाणून घ्या कसं ते?

स्लीप इंटर्नशिप हा प्रकार देशभरातील तरुणांमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. झोपेच्या सवयी, गुणवत्ता आणि विश्रांती याकडे लक्ष वेधण्यासाठी ‘वेकफिट’ या खासगी कंपनीने हा उपक्रम सुरू केला. झोपेची गुणवत्ता मोजण्यासाठी स्लीप ट्रॅकर्सचा वापर, गाद्या, मार्गदर्शन कार्यशाळा अशा अनेक गोष्टी या कार्यक्रमात अंतर्भूत होत्या. यंदाच्या फेरीसाठी देशभरातून एक लाखांहून अधिक अर्ज आले होते. त्यातून केवळ १५ जणांची अंतिम निवड झाली. त्यात पूजा वाव्हलने ९१.३६ गुण मिळवत अव्वल क्रमांक पटकावला.

या इंटर्नशिपमध्ये रोज सलग ६० दिवस, किमान नऊ तास झोप घ्यावी लागते. सहभागी व्यक्तींना झोपेच्या गुणवत्तेवर गुण दिले जातात. दररोजची झोप ही गाढ, सलग आणि विश्रांतीदायक असावी लागते. या काळात स्पर्धकांना झोपेविषयी उपयुक्त माहिती देणाऱ्या कार्यशाळांमध्येही सहभागी होण्याची संधी दिली जाते. पूजा म्हणते, “यूपीएससीचा अभ्यास करताना मेंदूला विश्रांती देणं खूप महत्त्वाचं आहे. ही संधी माझ्यासाठी दुहेरी फायद्याची ठरली.”

या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या प्रत्येक १५ इंटर्नला एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. पण त्यापलीकडे जाऊन पूजा वाव्हलने सर्वोत्तम कामगिरी करत ९ लाखांची भरघोस रक्कम जिंकली. तिच्या झोपेची गुणवत्ता, सातत्य आणि इतर लहान मोठ्या चाचण्यांतील उत्तम कामगिरी यामुळे ती विजेती ठरली.

हे पण वाचा : प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी! पुणे विमानतळावर ‘ही’ सेवा पुन्हा सुरु

या इंटर्नशिपसाठी अर्ज करण्यासाठी वयाची किमान अट २२ वर्षे असून, केवळ एकच अर्ज स्वीकारला जातो. २०१९ पासून सुरू झालेल्या या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. वेकफिट कंपनीच्या गाद्यांवर घरात राहून झोपून पैसे कमावण्याची संधी हा आजच्या ‘वर्क फ्रॉम होम’ संस्कृतीत एक हटके आणि हवेहवेसे वाटणारे उदाहरण ठरत आहे.

Leave a Reply