पुण्यातील वारजेच्या रस्त्यांवर खड्ड्यांचं राज्य! रस्त्यांची दुर्दशा पाहून नागरिक संतप्त
Warje Road
Warje Road : पुणे शहराच्या पश्चिम भागातील वारजे परिसर सध्या रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे अक्षरशः वेठीस धरला गेलाय. गणपती माथा ते वारजे उड्डाणपुलापर्यंतचा मुख्य रस्ता खड्ड्यांनी पोखरला असून, वाहनचालक आणि पादचाऱ्यांना दररोज मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसाळा सुरू होताच डांबरी रस्त्यांची चाळण झाली आहे आणि काँक्रिट रस्त्यांवरही मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत.
हे पण वाचा : सर्व पुणेकरांना मिळकत करात ४०% सूट मिळणार? आमदार रासने यांची मागणी विधानसभेत गाजली
वाहनधारकांसाठी हा रस्ता सध्या एक संकटमय धाडसच ठरत आहे. अनेक ठिकाणी खोल खड्डे पडले असून, त्यांचा अंदाज न आल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेस आणि पावसात ही समस्या अधिक गंभीर होते. दुचाकीस्वार गाडीवरचा ताबा गमावून पडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यातच, दररोजची वाहतूक कोंडी नागरिकांच्या संयमाची परीक्षा पाहत आहे.
स्थानिक रहिवासी प्रचंड त्रस्त झाले आहेत. एकीकडे पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचते आणि त्यात खड्डे झाकले जातात, तर दुसरीकडे रस्त्यांवरील हीच खड्ड्यांची मालिका प्रवाशांना अपघाताच्या उंबरठ्यावर आणून ठेवते. एका स्थानिक नागरिकाने सांगितले, “सकाळ-संध्याकाळ शाळा, नोकरी, बाजार अशी धावपळ असते. पण या खड्ड्यांमुळे गाड्या उशीराने चालतात. अनेक वेळा पाठीमागची वाहनं जोरात येऊन धडकतात. वेळ, पैसा आणि जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.”
वारजे परिसरात मोठी वसाहत, शैक्षणिक संस्था, आणि कार्यालये आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीचा ताण कायम असतो. पण महापालिकेच्या उदासीनतेमुळे खड्ड्यांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. काही ठिकाणी फक्त राडारोडा टाकून खड्डे बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला, पण त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली.
रस्त्यांवरील ही स्थिती केवळ वाहनधारकांनाच नव्हे तर रिक्षा, बस आणि अगदी रुग्णवाहिकांनाही अडचणीत टाकतेय. अपात्कालीन सेवांसाठी रस्ता मोकळा राहणे आवश्यक असताना इथे वेळेवर पोहोचणेही आव्हान ठरतंय. या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेवक आणि रहिवाश्यांनी तातडीने या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
