June 13, 2026

महाराष्ट्रातील ३८ लाख वीज ग्राहकांना दिलासा! वीज बिलात १०% सूट; फडणवीसांची मोठी घोषणा

0
Electricity Discount

Electricity Discount

Electricity Discount : राज्य सरकारकडून वीज ग्राहकांना दिलासा देणारा मोठा निर्णय जाहीर झाला आहे. राज्यात सध्या कार्यरत असलेल्या स्मार्ट पोस्टपेड मीटरधारक ३८ लाख ग्राहकांना सौर तासांमध्ये वापरलेल्या वीजेवर दहा टक्के सवलत दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत यासंदर्भात अधिकृत घोषणा केली असून, राज्यातील वीज धोरणातील हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.

हे पण वाचा : पुण्यातील वारजेच्या रस्त्यांवर खड्ड्यांचं राज्य! रस्त्यांची दुर्दशा पाहून नागरिक संतप्त

विधान परिषदेतील लक्षवेधी सूचनेदरम्यान सदस्य मिलिंद नार्वेकर, ॲड. अनिल परब आणि प्रवीण दरेकर यांनी स्मार्ट मीटर संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना फडणवीसांनी ही माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केलं की, “स्मार्ट मीटरमुळे वीजवापराचे मोजमाप अधिक अचूक आणि पारदर्शक झालं आहे. त्यामुळे ग्राहकांना नेमके बिल कळते आणि अनावश्यक वाद टाळले जातात.”

राज्यात सध्या २७ हजारांहून अधिक फिडर मीटर आणि ३८ लाख ग्राहक मीटर कार्यरत आहेत. हे मीटर ‘रिअल टाईम’ माहिती पुरवतात. विशेषतः सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग होईल अशा वेळेत वापरलेल्या वीजेवर ही १०% सूट लागू होणार आहे. यामुळे ग्राहकांना वीज वापराबाबत अधिक नियोजन करता येईल आणि पर्यावरणपूरक ऊर्जेचा उपयोगही प्रोत्साहन मिळेल.

मुख्यमंत्री फडणवीसांनी आणखी एक महत्त्वाची बाब अधोरेखित केली, ती म्हणजे स्मार्ट मीटर बसवणे सक्तीचं नाही, तर ही एक पर्यायी सुविधा आहे. ग्राहकांच्या निवडीला प्राधान्य देत ही योजना अंमलात आणली जात आहे. हे मीटर आपोआप युनिटचे मोजमाप करत असल्याने, बिल चुकीचं लागण्याची शक्यता जवळपास शून्य आहे.

हे पण वाचा : सर्व पुणेकरांना मिळकत करात ४०% सूट मिळणार? आमदार रासने यांची मागणी विधानसभेत गाजली

या योजनेसाठी केंद्र सरकारकडून २९ हजार कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्राला मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रियेद्वारे चार खासगी कंपन्यांना स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सोपवले गेले आहे. यामुळे वीज वितरण व्यवस्थेत पारदर्शकता, अचूकता आणि ग्राहकाभिमुखता या तिन्ही बाबतीत सुधारणा अपेक्षित आहे.

 

Leave a Reply

Discover more from Punelive24

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading