एलन मस्कची टेस्ला भारतात! मुंबईत पहिलं शोरूम सुरू, किंमत ऐकून व्हाल थक्क
Tesla India Launch
Tesla India Launch : जगभरात इलेक्ट्रिक वाहन क्रांती घडवणाऱ्या एलन मस्क यांच्या टेस्लाने अखेर भारतात अधिकृत प्रवेश केला आहे. अनेक वर्षांच्या चर्चेनंतर आणि अंदाजांनंतर आता प्रत्यक्षात टेस्लाची कार भारतीय रस्त्यांवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या १५ जुलैला टेस्लाचं देशातलं पहिलं शोरूम मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) परिसरात उघडणार आहे. या माध्यमातून टेस्लाने दक्षिण आशियामधील बाजारपेठेतही पहिलं पाऊल टाकलं आहे.
हे पण वाचा : व्होल्वोची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक SUV EX30 भारतात येणार; वाचा किंमत किती असणार?
या शोरूमचं बांधकाम जवळपास पूर्णत्वास आलं असून, सुमारे ४,००० स्क्वेअर फूट क्षेत्रात हे भव्य टेस्ला एक्सपीरिएंस सेंटर उभारण्यात आलं आहे. हे केवळ कार विक्रीचं ठिकाण न राहता, ग्राहकांना प्रत्यक्ष टेस्ला कार जवळून अनुभवता याव्यात यासाठी खास डिझाइन करण्यात आलं आहे. येथे ग्राहकांना टेस्ट ड्राईव्ह, फीचर्सचे प्रात्यक्षिक आणि कस्टमर सल्ला सेवा मिळणार आहे.
टेस्ला आपल्या खास ‘डायरेक्ट टू कस्टमर’ मॉडेलद्वारे भारतात कार विक्री करणार असून, विक्रीनंतरच्या सेवेसाठी स्थानिक तांत्रिक कर्मचारी आणि सहाय्यक कार्यरत असणार आहेत. यामुळे विक्रीनंतरची सेवा सुलभ व जलद होईल, असा विश्वास कंपनीकडून व्यक्त केला जात आहे.
टेस्लाची ही एन्ट्री ही केवळ मुंबईपुरती मर्यादित न राहता दिल्लीसह इतर मेट्रो शहरांत लवकरच शोरूम सुरू करण्याचे नियोजन आहे. याच पार्श्वभूमीवर अलीकडेच टेस्लाने मुंबई, पुणे आणि दिल्लीसाठी विविध पदांसाठी भरती जाहिरात दिली होती. यामध्ये सेल्स, ऑपरेशन्स, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, इंजिनिअरिंग, आयटी, एआय आणि कस्टमर सपोर्टसारख्या विभागांत नोकरीच्या संधी दिल्या गेल्या आहेत.
हे पण वाचा : एअर इंडिया विमान अपघाताचे खरे कारण अखेर समोर; वाचा अपघाताचा शॉकिंग रिपोर्ट
टेस्लाने लोढा लॉजिस्टिक्स पार्क येथे आपली ऑपरेशनल जागा भाड्याने घेतली असून, पाच वर्षांच्या कराराअंतर्गत दर महिन्याला ३७.५३ लाख रुपये भाडे दिलं जाणार आहे. कराराची एकूण किंमत सुमारे २५ कोटी रुपये असून, त्यात २.२५ कोटींचं डिपॉझिट समाविष्ट आहे.
सध्या सर्वात मोठा उत्सुकतेचा विषय म्हणजे टेस्ला कारची किंमत. अद्याप कंपनीकडून यावर अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, ब्लूमबर्गच्या अंदाजानुसार, इंपोर्ट केलेल्या ‘मॉडेल Y रियर व्हिल ड्राईव्ह’ या SUV ची संभाव्य किंमत सुमारे २७.७ लाख रुपये असून त्यावर २१ लाख रुपयांची इंपोर्ट ड्युटी लागू शकते. सध्या या गाड्यांचे पाच युनिट्स चीनमधून भारतात पोहोचले असून, ही SUV जगातील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार मानली जाते.
