मद्यप्रेमींसाठी वाईट बातमी! गटारी अमावस्याला दारू मिळणार नाही? नेमकं कारण काय
Liquor Price Hike
Liquor Price Hike : गटारी अमावस्या जवळ आली की महाराष्ट्रात मद्यप्रेमींमध्ये एक वेगळीच उत्सुकता असते. परमिट रूम आणि बारमध्ये गर्दी उसळते, सेलिब्रेशन रंगते. पण यंदा गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. दारूवरील करवाढीविरोधात राज्यातील हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट मालकांनी सरकारविरोधात बंड पुकारले आहे. इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (AHAR) ने दोन दिवसांचा अल्टीमेटम देत, सरकारने करवाढ मागे घेतली नाही तर बेमुदत संप करण्याचा इशारा दिला आहे.
हे पण वाचा : ‘या’ अॅपच्या माध्यमातून तपासा तुमचं सोन खरं आहे की खोट? वाचा संपूर्ण प्रक्रिया
गेल्या काही दिवसांत सरकारने दारूविक्रीवरील व्हॅट (VAT) ५ टक्क्यांवरून थेट १० टक्क्यांपर्यंत वाढवला. एवढेच नव्हे, तर दारूच्या परवाना शुल्कात तब्बल १५ टक्के वाढ झाली असून, उत्पादन शुल्कातही भर घालण्यात आली आहे. या वाढीमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत सापडला असून, असोसिएशनच्या म्हणण्यानुसार ही करवाढ अन्यायकारक आहे आणि ती तत्काळ मागे घेण्याची गरज आहे.
AHAR च्या मते, सरकारच्या या निर्णयाचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे. कारण बारमालकांनी दरवाढ थेट ग्राहकांकडे ढकलण्याची शक्यता आहे. परिणामी, गटारी अमावस्येसारख्या सणासुदीच्या काळात मद्यप्रेमींना खिशाला चाट लावावा लागणार आहे. शिवाय, जर बारमालकांनी संपाचा निर्णय अंमलात आणला, तर त्या दिवशी बार आणि परमिट रूम बंद राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे गटारीच्या रात्री दारू मिळवण्यासाठी लोकांना अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो.
अनेक बारमालकांनी सोशल मीडियावरही आपल्या नाराजीचा सूर चढवला असून, ग्राहकांच्या भावना ओळखून त्यांनी सरकारवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकसह इतर मोठ्या शहरांमध्ये देखील याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. गटारी हा हिवाळ्याआधीचा एक महत्त्वाचा सण मानला जातो. अनेक कुटुंबे या दिवशी खास जेवण आणि मित्रमंडळींसह गेट टुगेदर आयोजित करतात. अशावेळी दारूच्या अनुपलब्धतेचा किंवा दरवाढीचा फटका या उत्सवाच्या रंगात भंग घालू शकतो.
सरकारने यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली, तरी दोन दिवसांच्या अल्टीमेटमनंतर परिस्थिती काय वळण घेते, याकडे राज्यभरातील मद्यप्रेमी, बार मालक आणि हॉटेल व्यवसायिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
